"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 14:10 IST2025-12-15T14:09:27+5:302025-12-15T14:10:02+5:30
Bondi Beach Shooting : ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात झालेल्या गोळीबारात आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात झालेल्या गोळीबारात आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ४२ लोक गंभीर जखमी झाले आहेत. न्यूज एजन्सी एपीच्या अहवालानुसार, हा हल्ला यहूदींचा उत्सव 'हनुक्का'च्या आयोजनादरम्यान करण्यात आला. वडील आणि मुलाने मिळून हा हल्ला केला. साजिद अकरम आणि नवीद अकरम अशी दहशतवाद्यांची नावं आहेत. हल्ल्यानंतर हल्लेखोर मुलाच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे.
न्यू साउथ वेल्स पोलिसांनी या हल्ल्याला ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील सर्वात मोठा यहूद विरोधी हल्ला म्हटलं आहे. हल्ल्यातील ५० वर्षीय आरोपी साजिद अकरमचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्याचा २४ वर्षीय मुलगा नवीद अकरम पोलीस कोठडीत आहे. 'टेलीग्राफ'च्या रिपोर्टनुसार, नवीदची आई वेरेना अकरमने सांगितलं की, "माझ्या मुलाने दहशतवादी हल्ला केला असेल यावर माझा विश्वास बसत नाही. माझा मुलगा खूप चांगला आहे. तो दारू पीत नाही किंवा धूम्रपानही करत नाही. माझा मुलगा कधीही वाईट संगतीत नव्हता."
सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद
ऑस्ट्रेलियातील एका इस्लामिक सेंटरच्या सोशल मीडिया पोस्टमधून अशी माहिती मिळाली आहे की, नवीदने २०२२ मध्ये धार्मिक शिक्षण पूर्ण केलं होतं. अल-मुराद इस्लामिक इन्स्टिट्यूटचे प्रमुख ॲडम इस्माईल यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यास नकार दिला. 'डेली मेल'च्या अहवालानुसार, हल्ल्यानंतर पोलीस आरोपींच्या घरी तपास करण्यासाठी पोहोचले होते, परंतु त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी पोलिसांना घेराव घातला आणि तपास थांबवण्याचा प्रयत्नही केला.
ऑस्ट्रेलियाची तपास यंत्रणा या दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानी संबंध देखील शोधत आहे, कारण हल्लेखोर मूळचे पाकिस्तानचे आहेत. माध्यमांशी बोलताना नवीदची आई वेरेनाने सांगितलं की, तिचा मुलगा सध्या बेरोजगार होता. नवीदचे वडील फळे विकण्याचं काम करत होते. वडील आणि मुलाने दहशतवादी घटना करण्यापूर्वी घरी सांगितलं होतं की, ते मासे पकडण्यासाठी जात आहेत.