धक्कादायक दावा! अमेरिका-इस्रायलविरुद्ध इराण युद्धात चीनची उडी?; अमेरिकन रिपोर्टनं खळबळ उडाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:48 IST2026-03-18T16:47:46+5:302026-03-18T16:48:30+5:30
२०२१ मध्ये या दोन्ही देशांकडून सर्वात मोठे पाऊल पुढे टाकण्यात आले होते. जेव्हा दोन्ही देशांनी एका मोठ्या २५ वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली.

धक्कादायक दावा! अमेरिका-इस्रायलविरुद्ध इराण युद्धात चीनची उडी?; अमेरिकन रिपोर्टनं खळबळ उडाली
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेच्या ताज्या रिपोर्टनं खळबळ माजली आहे. चीन इराणी सैन्याला तांत्रिकदृष्ट्या मदत करत आहे. चीन इराणला ड्रोन, एंटी शिप क्रूझ मिसाइल आणि रॉकेट फ्यूल बनवण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान देत आहे असा रिपोर्ट US चीन इकोनॉमिक अँन्ड सिक्युरिटी रिव्ह्यू कमिशनने जारी केला आहे.
रिपोर्टनुसार, २ मार्चला चीनची अशी २ जहाजे केमिकल घेऊन इराणकडे गेलीत, ज्याचा वापर रॉकेट फ्यूल बनवण्यासाठी केला जातो. चीन आता त्याची रणनीती बदलत आहे. याआधी आखाती देशांशी असलेले संबंध खराब होण्याच्या भीतीने चीन इराणला थेट सैन्य मदत देत नव्हता आणि केवळ ड्यूल यूज तंत्रज्ञान द्यायचा परंतु आता चीन थेट संरक्षणाशी निगडित तंत्रज्ञान इराणला देत आहे. चीनचं BeiDou Navigation System(BNS) चा वापर इराणकडून करण्यात येत असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
चीन कशी करतोय मदत?
मध्य पूर्वेतील युद्धात BRICS आणि शांघाय कोर्पोरेशन ऑर्गेनायझेशनसारख्या व्यासपीठाच्या माध्यमातून चीन आणि इराण यांच्यातील संबंध मजबूत होत आहेत. मध्य पूर्वेत अमेरिका इस्रायलविरुद्ध इराण युद्धातच हा रिपोर्ट समोर आला आहे. यामुळे जागतिक राजकारणात चिंता वाढली आहे. इराण आणि चीन यांच्यात मागील काही काळापासून संबंध घट्ट होत आहेत. हे संबंध केवळ राजनैतिकदृष्ट्या मर्यादित नाहीत तर व्यापार, तेल-गॅस तंत्रज्ञान आणि सुरक्षेपर्यंत पसरले आहे.
दरम्यान, २०२१ मध्ये या दोन्ही देशांकडून सर्वात मोठे पाऊल पुढे टाकण्यात आले होते. जेव्हा दोन्ही देशांनी एका मोठ्या २५ वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार चीन इराणमध्ये रस्ते, बंदरे, ऊर्जा आणि तंत्रज्ञान यांमध्ये गुंतवणूक करेल. त्या बदल्यात इराण चीनला परवडणाऱ्या दरात तेल आणि वायूचा पुरवठा करेल. यामुळे दीर्घकाळात दोन्ही देशांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.