माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाला आहे का? पाकिस्तान सरकारने दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 09:43 IST2025-11-27T09:42:51+5:302025-11-27T09:43:33+5:30
Imran Khan Health Update Pakistan: इम्रान खान यांची प्रकृती खालावली असून त्यांच्या निधनाचाही दावा करण्यात येत आहे

माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाला आहे का? पाकिस्तान सरकारने दिली माहिती
Imran Khan Health Update Pakistan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान बऱ्याच काळापासून तुरुंगात आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर तुरुंगात पोलिसांकडून अत्याचार करण्यात आल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर पाकिस्तान सरकारने कोणतेही स्पष्टीकरण दिले नव्हते. पण गेल्या दोन-तीन दिवसांपासून इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत प्रचंड चर्चा रंगल्या आहेत. काहींच्या मते त्यांची प्रकृती खालावली आहे, तर काहींनी इम्रान यांच्या निधनाचाही दावा केला आहे. या सर्व चर्चांदरम्यान आता पाकिस्तान सरकारकडून काही गोष्टींची स्पष्टता करण्यात आली आहे.
इम्रान खान यांची प्रकृती उत्तम
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आदियाला तुरुंगात पुरवल्या जाणाऱ्या परिस्थिती आणि सुविधांबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत आता माहिती समोर आली आहे. रावळपिंडीतील आदियाला तुरुंगाच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे की PTIचे संस्थापक इम्रान खान यांचे निधन झालेले नाही. त्यांची प्रकृती उत्तम आहे. प्रशासनाने म्हटले आहे की इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दल पसरवल्या जाणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. इम्रान खान यांना सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत.
संरक्षणमंत्र्यांनी सुविधांची यादीच वाचली
इम्रान खान यांच्या तुरुंगातील परिस्थितीबद्दल वाढत्या प्रश्नांदरम्यान, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही माहिती दिली. त्यांनी दावा केला की इम्रान खान यांना तुरुंगात पूर्वीपेक्षा खूप जास्त आराम आणि सुविधा मिळत आहे. आसिफ यांनी उपहासात्मक टिप्पणी केली की खान यांना जे जेवण दिले जाते, ते पंचतारांकित हॉटेलच्या मेन्यूपेक्षाही चांगले आहे. त्यांना टीव्ही देण्यात आला आहे. व्यायामासाठी फिटनेस मशीन देखील आहेत. इम्रान खान यांना तुरुंगात डबल बेड, मखमली गादी आणि इतर चांगल्या सुविधाही देण्यात आल्या आहेत.
मृत्यूची अफवा का पसरली?
इम्रान खान यांच्या बहिणी अलिमा खान, नोरीन नियाझी आणि डॉ. उज्मा खान यांनी त्यांच्या समर्थकांसह तुरुंगाबाहेर धरणे आंदोलन केले. त्यांनी आरोप केला की त्यांना इम्रान खानला भेटू दिले जात नाही. निदर्शनादरम्यान, पंजाब पोलिसांनी जबरदस्तीने मारहाण केल्याचेही आरोप समोर आले. ७१ वर्षीय नोरीन खान यांनी दावा केला की त्यांना केस धरून ओढण्यात आले आणि इतर महिलांवरही हल्ला करण्यात आला. या घटनांमध्ये, इम्रान खान यांच्या अचानक मृत्यूच्या आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवल्याच्या अफवाही सोशल मीडियावर पसरू लागल्या. तथापि, यापैकी कोणत्याही दाव्याची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. उलट इम्रान यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे.