पाकचा अफगाणवर बॉम्बहल्ला, ४०० ठार; दहशतवादी तळ समजून व्यसनमुक्ती केंद्र उडविले, २५० जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 06:43 IST2026-03-18T06:42:43+5:302026-03-18T06:43:20+5:30
हा हल्ला मानवताद्रोही, क्रूरतेचा कळस : भारताने केला निषेध

पाकचा अफगाणवर बॉम्बहल्ला, ४०० ठार; दहशतवादी तळ समजून व्यसनमुक्ती केंद्र उडविले, २५० जखमी
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी सोमवारी अफगाणिस्तानमधील अनेक ठिकाणी भयंकर बॉम्बहल्ले केले. त्यामध्ये काबुल येथील एका व्यसनमुक्ती रुग्णालय संकुलालाही लक्ष्य करण्यात आले. यात ४०० जण ठार आणि २५० जण जखमी झाले. क्रुरतेचा कळस गाठणाऱ्या या हल्ल्याबद्दल भारतानेपाकिस्तानचा तीव्र निषेध केला. मात्र आम्ही रुग्णालयावर नव्हे तर दहशतवादी व त्यांना मदत करणारे लष्करी तळ यांना लक्ष्य केले असे पाकिस्तानने म्हटले आहे.
तालिबान्यांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन गझब लिल हक’ ही मोहीम सुरू केली आहे. त्याद्वारे सोमवारी रात्री काबुल, नंगरहार परिसरात हवाई हल्ले करण्यात आले असे पाकिस्तानने म्हटले आहे. दारुलअमान, अरजान कीमत, खैरखाना आणि काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात अनेक ठिकाणी स्फोट आणि गोळीबाराचे आवाज ऐकू आले. तालिबान सरकारचे उपप्रवक्ते हमदुल्ला फित्रत यांनी सांगितले की, पाकिस्तानने काबुलमध्ये व्यसनमुक्ती रुग्णालयावर बॉम्ब टाकले. त्यात मोठी जीवितहानी झाली आहे. पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये २६०० किमी लांबीची सीमा आहे. तिथे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांत हल्ले, प्रतिहल्ले सुरू आहेत.
हल्ल्यावेळी संकुलात ३ हजार लोक
तालिबान सरकारचे उपप्रवक्ते हमदुल्ला फित्रत यांनी सांगितले की, रुग्णालय संकुलावर हल्ल्यानंतर आग लागली. ही आग शर्थीच्या प्रयत्नानंतर विझविण्यात आली. यात संकुलातील पाच इमारतींची मोठी हानी झाली असून, त्यांच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. त्या रुग्णालयात तीन हजार रुग्ण उपचार घेत होते. मात्र पाकिस्तानने काबुल येथे तसेच नंगरहार प्रांतात आम्ही हल्ले करून तालिबानची लष्करी ठिकाणे, दारूगोळ्याची कोठारे नष्ट केली, असा दावा केला आहे.
अहमदियांवर क्रूर हल्ले : पाककडून अहमदिया पंथीयांवर होणारे क्रूर हल्ले तसेच अफगाणवरचे हवाई हल्ले यांचा भारताने तीव्र निषेध केला. असहाय्य अफगाण नागरिकांची हकालपट्टी करणे, त्यांच्यावर हवाई हल्ले करणे ही पाकची क्रूर कृत्ये आहेत, असे भारताने म्हटले आहे.