Pakistan attack Afghanistan: पाकिस्तानी लष्कराचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला, लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 10:18 IST2025-11-25T10:11:04+5:302025-11-25T10:18:12+5:30
Pakistan strikes Afghanistan: पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानातील सीमावर्ती भागात बॉम्ब हल्ला केला. यात लहान मुलांसह एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

Pakistan attack Afghanistan: पाकिस्तानी लष्कराचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला, लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू
पाकिस्तानी लष्कराने पुन्हा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला. तालिबानचे प्रवक्ते जबीऊल्लाह मुजाहिद यांनी मंगळवारी (२५ नोव्हेंबर) रोजी सांगितले की, अफगाणिस्तानातील खोस्त प्रांतात असलेल्या एका घरावरच पाकिस्तानी लष्कराकडून बॉम्ब टाकण्यात आले. यात ९ मुले आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानने कुनार आणि पक्तिका प्रांतातही हल्ले केले आहेत. त्यात चार लोक जखमी झाले आहेत. रॉयटर्स वृत्त संस्थेने याबद्दलचे वृत्त दिले आहे.
अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार आहे. तालिबानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानकडून हल्ला मध्यरात्री करण्यात आला. एका स्थानिक व्यक्तीच्या घराला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यामुळे सीमेवर तणाव वाढला असून, युद्धाचे ढग गडद होण्याची शक्यता वाढली आहे.
तालिबानचे प्रवक्ता मुजाहिद म्हणाले, "हल्ला खोस्त प्रांतातील गुरबुज जिल्ह्यातील मुघलगई भागात करण्यात आला. मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास हल्ला केला गेला. पाकिस्तानच्या लष्कराने एका एक स्थानिक नागरिक काझी मीर यांचा मुलगा वलियात खान यांच्या घरावर बॉम्ब टाकले. यात नऊ मुले (ज्यात पाच मुले आणि चार मुली) आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यांचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे."
वेगवेगळ्या ठिकाणी पाकिस्तानचे हल्ले
पाकिस्तानी लष्कराने एकाच वेळी अफगाणिस्तानातील वेगवेगळ्या भागात हल्ले केले आहेत. मुजाहिद यांनी याला दुजोरा दिला आहे. कुनार आणि पक्तिका या प्रांतातही हवाई हल्ले करण्यात आले आहेत. त्यात चार लोक जखमी झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.
ऑक्टोबरमध्ये दोन्ही देशात लष्करी संघर्ष
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात ऑक्टोबर महिन्यात लष्करी संघर्ष झाला होता. ९ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानातील काबूल, खोस्त, जलालाबाद आणि पक्तिका येथे हवाई हल्ले करण्यात आले होते. त्यानंतर अफगाणिस्तानच्या तालिबानने प्रत्युत्तर दिले होते.
११ आणि १२ ऑक्टोबरच्या मध्यरात्री तालिबानने सीमेलगत असलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवर हल्ले केले होते. त्यानंतर संघर्ष उफाळून आला होता. हल्ला केल्यानंतर तालिबान सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले होते की, त्यांचे ऑपरेशन संपले आहे. पण, पाकिस्तानने शस्त्रसंधी झाली नसल्याचे सांगत लष्करी कारवाई सुरूच ठेवली होती.