ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 17:10 IST2026-01-15T17:10:09+5:302026-01-15T17:10:38+5:30
लष्कर-ए-तैयबा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर हाफिज अब्दुल रऊफ याने अखेर भारताच्या शक्तीसमोर गुडघे टेकल्याचे चित्र दिसत आहे.

ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
भारतीय लष्कराने हाती घेतलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'ने सीमापार असलेल्या दहशतवादी संघटनांची झोप उडवली आहे. लष्कर-ए-तैयबा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर हाफिज अब्दुल रऊफ याने अखेर भारताच्या शक्तीसमोर गुडघे टेकल्याचे चित्र दिसत आहे. "तो हल्ला इतका मोठा होता की केवळ अल्लाहनेच आम्हाला वाचवले," अशा शब्दांत रऊफने भारतीय सैन्याच्या अचूक प्रहाराची कबुली दिली आहे. मुरीदके येथील मरकझ-ए-तैयबा येथे बोलताना या दहशतवाद्याच्या चेहऱ्यावर भारतीय लष्कराची दहशत स्पष्टपणे दिसत होती.
२२ मिनिटांत ९ तळे उद्ध्वस्त!
भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ऑपरेशन सिंदूर' ही केवळ एक कारवाई नसून तो शत्रूसाठी दिलेला निर्णायक इशारा आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हे ऑपरेशन राबवण्याचा संकल्प केला होता. या मोहिमेत भारतीय भूदल, नौदल आणि हवाई दलाने त्रिशूळ हल्ला करत अवघ्या २२ मिनिटांत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळे अचूक लक्ष्य करून जमीनदोस्त केली.
"मोदींनी पाकिस्तानला ठोकलं, आमची मशीदही पाडली"
हाफिज रऊफने आपल्या भाषणात सांगितले की, "६-७ मे रोजी मुरीदकेमध्ये जे काही घडले ते भीषण होते. ज्या मशिदीत आम्ही बसतो, त्या मशिदीलाच लक्ष्य करून उद्ध्वस्त करण्यात आले. मोदींनी दावा केला की त्यांनी दहशतवादी तळांवर हल्ला केला, पण प्रत्यक्षात त्यांनी थेट पाकिस्तानलाच धडा शिकवला आहे." विशेष म्हणजे, या हल्ल्याची माहिती आधीच असल्याने तेथून मुलांना हटवण्यात आले होते, असेही त्याने कबूल केले.
पाकिस्तानी लष्कर प्रमुखांच्या डोळ्यात पाणी?
रऊफने आपल्या भाषणात पाकिस्तानच्या असहायतेवरही भाष्य केले. तो म्हणाला, "आमचे लष्कर प्रमुख रडत होते आणि सांगत होते की आमच्याकडे सर्व माहिती होती, तरीही आम्ही काही करू शकलो नाही." भारताच्या या कारवाईमुळे जागतिक बाजारपेठेवर आणि लष्करी रणनीतीवर मोठे परिणाम झाले आहेत. ज्या लढाऊ विमानांचा गवगवा युरोपात होता, ती आता भंगार वाटू लागली आहेत आणि भारताने जगाला आपली ताकद दाखवून दिली आहे, असेही हाफिजने बडबडताना मान्य केले.
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच!
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, भारतीय लष्कराची ही कारवाई अजून संपलेली नाही. "ऑपरेशन सिंदूर आजही सुरू आहे आणि शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर आमची करडी नजर आहे," असे जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ठामपणे सांगितले आहे. भारताचा हा आक्रमक पवित्रा पाहून सीमापार असलेल्या दहशतवादी कारखान्यांमध्ये आता दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.