१९४५ ते २०१७ दरम्यानच्या अणुचाचण्या; अणुसंसर्गाने जगभरात ४० लाख अकाली मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 14:40 IST2026-01-24T14:39:14+5:302026-01-24T14:40:34+5:30
सध्या भारत, रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स, ब्रिटन, पाकिस्तान, इस्रायल आणि उ. कोरियाकडे अण्वस्त्रे आहेत.

१९४५ ते २०१७ दरम्यानच्या अणुचाचण्या; अणुसंसर्गाने जगभरात ४० लाख अकाली मृत्यू
वॉशिंग्टन : १९४५ ते २०१७ या काळात जगभरात २,४००हून अधिक अणुचाचण्या करण्यात आल्यात. या चाचण्यांच्या परिणामामुळे कालांतराने कर्करोग आणि इतर आजारांमुळे जगात किमान ४० लाख जणांचा अकाली मृत्यू झाल्याची माहिती नॉर्वेजियन पीपल्स एड (एनपीए) या मानवतावादी संस्थेच्या नव्या अहवालात देण्यात आली आहे. सध्या भारत, रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स, ब्रिटन, पाकिस्तान, इस्रायल आणि उ. कोरियाकडे अण्वस्त्रे आहेत.
फ्रेंच पॉलिनेशियातील ताहिता येथील संसद सदस्य हिनामोएउरा क्रॉस या अणुचाचण्यांचे बळी ठरल्या आहेत. फ्रान्सने १९९६ मध्ये शेवटची अणुचाचणी केली तेव्हा क्रॉस या केवळ सात वर्षांच्या होत्या. त्यानंतर सतरा वर्षांनी त्यांना ल्युकेमियाचे निदान झाले. त्यांच्या कुटुंबात याआधीच आजी, आई, मावशी यांना थायरॉइड कॅन्सर झाला होता. अणुचाचण्यांमुळे आम्हाला हे सर्व भोगावे लागले असे त्यांचे मत एनपीएच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
‘अणुचाचण्यांचे परिणाम अतिशय घातक’
एनपीए संस्थेचे प्रमुख रेमंड जोहान्सन यांनी सांगितले की, भूतकाळातील अणुचाचण्या आजही लोकांचा जीव घेत आहेत. या चाचण्या बंद करा, लोकांच्या जिवाशी खेळू नका ही मागणी जोरकसपणे होण्यासाठी आम्ही हा अहवाल तयार केला आहे. अमेरिका पुन्हा अणुचाचण्या सुरू करू शकते असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये सूचित केले होते. रशिया आणि चीन अणुचाचण्या करतात असा आरोप ट्रम्प यांचा होता.
‘लहान मुलांना जपणे अधिक महत्त्वाचे’
भूतकाळातील अणुचाचण्यांचा सर्वांत मोठा फटका चाचणी स्थळांच्या जवळ राहणाऱ्या समुदायांना बसला आहे. ही स्थळे आज १५ देशांत आहेत, ज्यात अनेक अण्वस्त्रधारी देशांच्या माजी वसाहतींचा समावेश आहे. अणुचाचण्यांमुळे पोटातील गर्भ, लहान मुले यांच्यावर सर्वांत विपरीत परिणाम होतो. मुली आणि महिलांमध्ये किरणोत्सर्गामुळे कर्करोग होण्याची शक्यता मुलांपेक्षा व पुरुषांत ५२% अधिक आहे असे एनपीए संस्थेच्या ताज्या अहवालात म्हटले आहे.