गावात घुसले ISISशी संबंधित टोळीचे दहशतवादी, केला बेछूट गोळीबार, २०० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 11:25 IST2026-02-05T11:25:24+5:302026-02-05T11:25:39+5:30
Nigeria Terror Attack: नायजेरियामधील क्वारा राज्यात मंगळवारी संघ्याकाळी दहशतवाद्यांच्या एका गटाने केलेल्या भीषण हल्ल्यात २०० लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्लामिक स्टेटशी संबंधित असलेल्या एका गटाने वोरो आणि नुकू या गावात हल्ला करून ग्रामस्थांचे भयंकर हत्याकांड घडवून आणले.

गावात घुसले ISISशी संबंधित टोळीचे दहशतवादी, केला बेछूट गोळीबार, २०० जणांचा मृत्यू
नायजेरियामधील क्वारा राज्यात मंगळवारी संघ्याकाळी दहशतवाद्यांच्या एका गटाने केलेल्या भीषण हल्ल्यात २०० लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्लामिक स्टेटशी संबंधित असलेल्या एका गटाने वोरो आणि नुकू या गावात हल्ला करून ग्रामस्थांचे भयंकर हत्याकांड घडवून आणले. गेल्या काही महिन्यांमध्ये नायजेरियात झालेला हा सर्वात भीषण हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे.
या हत्याकांडाबाबत माहिती देताना स्थानिक खासदार मोहम्मद उमर बायो यांनी सांगितले की, या नरसंहारामागे लकुरावा नावाच्या एका सशस्र टोळीचा हात आहे. ही टोळी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. हल्लेखोरांनी गावात घुसून बेछूट गोळीबार केला. त्यात ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर मारले गेले.
तर रेड क्रॉस संघटनेने सांगितले की, ज्या भागात हा हल्ला झाला आहे. ते भाग दुर्गम परिसरात वसलेले आहेत. हे गाव राज्याच्या राजधानीपासून सुमारे ८ तास दूर अंतरावर आहेत. हा भाग बेनिन सीमेजवळ अशून, तिथे रस्ते आणि दळणवळणाची पुरेसी सुविधा उपलब्ध नाही आहे. तसेच संपर्काच्या अपुऱ्या साधनांमुळे मदत आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत.
क्वारा राज्याचे गव्हर्नर अब्दुल रहमान अब्दुल रझाक यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. त्यांनी या हल्ल्याची संभावना भ्याड कृत्य म्हणून केली आहे. राज्यात सुरू असलेल्या लष्करी मोहिमांना प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला असावा, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
दरम्यान, नायजेरिया सध्या सुरक्षाविषयक गंभीर संकटांचा सामना करत आहे. देशाच्या उत्तर-पूर्व भागात दीर्घकाळापासून बंड सुरू आहे. तर उत्तर-पश्चिम आणि उत्तर मध्य भागांमध्ये अपहरण खंडणीखोरी आणि सशस्त्र दरोड्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तसेच यामुळे सर्वसामान्य नागरिक हिंसेचे सर्वाधिक शिकार होत आहेत.