Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 13:26 IST2025-10-05T13:24:13+5:302025-10-05T13:26:06+5:30
Nepal Landslide Today: राजकीय अस्थिरतेतून पूर्वपदावर येत असलेल्या नेपाळला निसर्गाने तडाखा दिला. २४ तासांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नेपाळमधील अनेक भाग ठप्प झाले आहेत.

Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
Nepal Landslide Latest News: नेपाळमधील काही भागांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. काही ठिकाणी ढगफुटी होऊन भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूर्व नेपाळमधील विमान सेवा विस्कळीत झाली आहे. महामार्गही बंद झाले असून, शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. भूस्खलनाच्या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर काही घटनांतही काही जणांना जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोशी प्रांत पोलीस कार्यालयाचे प्रवक्ते पोलीस अधीक्षक दीपक पोखरेल यांनी सांगितले की, सुर्योदय महापालिका हद्दीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. इलम महापालिका हद्दीत सहा, देऊमई महापालिका हद्दीत तीन आणि फक्फोथून नगर परिषदेच्या हद्दीत एकाचा मृत्यू झाला आहे.
सध्या आमच्याकडे प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळाची पाहणी सुरू आहे. माहिती घेतली जात असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे, असे पोखरेल यांनी सांगितले.
भूस्खलनाच्या घटनांमध्ये १८ जणांचा मृत्यू
रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, इलम जिल्ह्यात झालेल्या वेगवेगळ्या भूस्खलनाच्या घटनांमध्ये १८ लोक मरण पावले आहेत. हा जिल्हा भारताच्या पूर्वेकडील सीमेला लागून आहे. पोलीस अधिकारी बिनोद घिरमिरे यांनी सांगितले की, दक्षिण नेपाळमध्ये वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण पुरात वाहून गेल्याने मरण पावला.
११ लोक पुरात गेले वाहून
नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण आणि व्यवस्थापनचे प्रवक्ते शांती महत यांनी सांगितले की, शनिवारी (४ ऑक्टोबर) ११ लोक पुरात वाहून गेले. ते अजूनही बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
भूस्खलन झाल्यामुळे अनेक ठिकाणी महामार्ग बंद झाले आहेत. काही ठिकाणी पुरामुळे रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी हजारो प्रवासी अडकून पडले आहेत. नेपाळमधील विमान सेवाही विस्कळीत झाली आहे. आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू असली, तरी देशांतर्गत विमानसेवा ठप्प झाली आहे, असे काठमांडू विमानतळाचे प्रवक्ते रिन्जी शेरपा यांनी सांगितले.