पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 16:37 IST2025-09-22T16:36:25+5:302025-09-22T16:37:58+5:30

या भीषण नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 1,006 जणांचा बळी गेला आहे. तर 30.2 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

Natural disaster in Pakistan More than 1000 people die due to heavy rains and floods | पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू

पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू

पाकिस्तानात 26 जूनपासून मुसळधार पाऊस आणि अचानक आलेल्या पुरांमुळे हाहाकार उडाला आहे. या भीषण नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 1,006 जणांचा बळी गेला आहे. तर 30.2 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) दिलेल्या माहितीनुसार, देशभरात 5,768 बचाव मोहिमा राबवण्यात आल्या, यांमध्यये तब्बल 273524 एवढ्या मदतसामग्रीचे वितरण करण्यात आले. महत्वाचे म्हणजे, एनडीएमए, प्रांतीय आपदा व्यवस्थापन प्राधिकरण (PDMA), पाकिस्तान सैन्य आणि इतर आपत्कालीन सेवांच्या अथक प्रयत्नांमुळे 741 छावण्यांमध्ये 6,62,098 लोकांवर उपचार करण्यात आले.

मृत्यू आणि जखमींची आकडेवारी अशी -
पाऊस आणि पूर यांमुळे मृत्यू पावलेल्यांचा सर्वाधिक आकडा पंजाबात नोंदवला गेला आहे. मृतांचा विचार करता...
- पंजाबमध्ये सर्वाधिक ३०४ मृत्यू नोंदवले गेले आहेत. यांत ११० मुले, १४३ पुरुष आणि ५१ महिलांचा समावेश आहे.
- खैबर पख्तूनख्वा मध्ये ५०४ मृत्यू नोंदवले गेले यांत ९० मुले, ३३८ पुरुष, ७६ महिलांचा समावेश आहे.
- सिंधमध्ये ८० जणांचा मृत्यू झाला आहे.
- बलुचिस्तानात ३० जणांचा मृत्यू नोंदवला गेला तर इस्लामाबादमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
- याशिवाय पाकिस्तानच्या ताब्यातील गिलगित-बाल्टिस्तान मध्ये ४१ तर जम्मू व काश्मीरमध्ये ३८ जमांचा मृत्यू झाला.

याशिवाय, देशभरात एकूण १,०६३ लोक जखमी झाले आहेत. यात पंजाबमधील ६६१, खैबर पख्तूनख्वामधील २१८, सिंधमधील ८७, गिलगित-बाल्टिस्तानमधील ५२, जम्मू-काश्मीरमधील ३७, बलुचिस्तानमधील ५ आणि इस्लामाबादमधील ३ जणांचा समावेश आहे. 

28.1 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले -
महत्वाचे म्हणजे, बचावासाठी सर्वाधिक मोहिमा पंजाब प्रांतात राबवल्या गेल्या. येथे 4,749 मोहिमांद्वारे 28.1 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. सिंध प्रांतात 753 मोहिमांद्वारे 1,84,011 लोकांना, तर खैबर पख्तूनख्वामध्ये 211 मोहिमांद्वारे 14,317 लोकांना वाचवण्यात आले. याशिवाय, या आपत्तीत मालमत्ता आणि पायाभूत सुविधांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान जाले आहे. देशभरात 12,569 घरे प्रभावित झाली आहेत, यांपैकी 4,128 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच 6,509 पशुधनाचे नुकसान झाले. सुमारे 239 पूल आणि 1,981 किलोमीटर रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत.

Web Title: Natural disaster in Pakistan More than 1000 people die due to heavy rains and floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.