टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 14:14 IST2025-10-04T14:12:40+5:302025-10-04T14:14:18+5:30
नागपूरचे प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी नादिरा गुलशन यांचा इटलीमध्ये झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला.

टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
नागपूरचे प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी नादिरा गुलशन यांचा इटलीमध्ये झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांची २१ वर्षांची मुलगी आरजू अख्तर या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. तसेच त्यांची दुसरी मुलगी शिफा आणि मुलगा जाझेल हे देखील या अपघातात जखमी झाले आहेत. इटलीच्या ग्रोसेटोजवळील ओरिलिया महामार्गावर हा अपघात झाला.
जावेद अख्तर यांच्या मुलाने शुद्धीवर आल्यानंतर स्थानिक हेल्पलाइन नंबरवर कॉल केला, ज्यानंतर नागपूरमधील त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. नागपूरमध्ये त्यांचं गुलशन प्लाझा हॉटेल आहे. नागपूरचे जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्हा प्रशासन इटालियन दूतावासाशी सतत संपर्कात आहे आणि त्यांचे मृतदेह भारतात परत आणण्याची व्यवस्था केली जात आहे.
इटालियन वृत्तसंस्था एएनएसएच्या मते, आशियाई पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनची मिनीबसशी टक्कर झाल्याने ग्रोसेटो येथील ओरिलिया राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. या घटनेत मुलांसह पाच जण जखमी झाल्याचं म्हटलं आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं.
इटलीतील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, ते पीडितांच्या कुटुंबियांशी आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे. "आम्ही कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत आहोत" असं म्हटलं आहे. X वरील एका पोस्टमध्ये, दूतावासाने ग्रोसेटोजवळ झालेल्या अपघातात महाराष्ट्रातील नागपूर येथील दोन भारतीय नागरिकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.