आईला चोरावा लागला स्वत:च्या मुलीचा मृतदेह! मृत्यूनंतर एक आठवडा उलटूनही अंत्यसंस्कार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 08:03 IST2026-01-23T07:57:42+5:302026-01-23T08:03:59+5:30
तेहरानमध्ये फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेणारी २३ वर्षांची रुबिना अमिनियन ही तरुणी.

आईला चोरावा लागला स्वत:च्या मुलीचा मृतदेह! मृत्यूनंतर एक आठवडा उलटूनही अंत्यसंस्कार नाही
तेहरानमध्ये फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेणारी २३ वर्षांची रुबिना अमिनियन ही तरुणी. मैत्रिणींसोबत कॉलेजमधून ती परत येत होती. त्यांना दिसलं, काही इराणी नागरिक, रस्त्यात आंदोलन करीत आहेत. रुबिना आणि तिच्या मैत्रिणीही रस्त्याने जाताना या जमावात सहभागी झाल्या.
जमावाला पांगविण्यासाठी सुरक्षारक्षक लाठीमार, गोळीबार करीत होते. अचानक एक गोळी रुबिनाच्या डोक्याच्या मागच्या बाजूला लागली. क्षणार्धात ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिच्या मैत्रिणी या घटनेने प्रचंड घाबरल्या आणि त्याही सैरावैरा पळाल्या. खरं तर रुबिना त्याच वेळी मृत्युमुखी पडलेली होती. तिच्या एका मैत्रिणीने धीर दाखवला आणि रुबिनाच्या आईला फोन करून रुबिनाला गोळी लागल्याचे सांगितले. त्यावेळी रुबिनाची आई तेहरानपासून सुमारे ४६० किलोमीटर दूर असलेल्या करमनशाह शहरात होती.
आपल्या मुलीला किती लागले असेल, तिची तब्येत कशी असेल, तिला कोणी दवाखान्यात तरी भरती केले असेल की नाही, या विचाराने रुबिनाची आई अमीना चिंताग्रस्त स्थितीत तत्काळ तेहरानला रवाना झाली. ज्यावेळी ती घटनास्थळी पोहोचली, तेव्हा तिची शुद्ध हरपायची तेवढीच बाकी होती. कारण रस्त्यावर सगळीकडे मृतदेहांचा खच पडला होता. अशा स्थितीतही आपली मुलगी जिवंत असावी, अशी त्या माउलीला आशा होती.
रुबिना कुठेच दिसेना, तेव्हा तिने मृतदेहांचे ढिगारे उपसायला सुरू केले. जे होऊ नये, असे वाटत होते, तेच झाले होते... त्या ढिगाऱ्यातच तिला आपल्या लाडक्या मुलीचा मृतदेह सापडला, पण अशा स्थितीतही मोठ्याने आकांत करण्याची चोरी होती! सुरक्षारक्षकांच्या परवानगीशिवाय मृतदेह घरी नेणं किंवा तिथून हलवणंही शक्य नव्हतं, पण नंतर तो मृतदेहही आपल्या नजरेस पडणार नाही, याची त्या माउलीला खात्री होती. शेवटी आपलं आक्रंदन आणि हुंदके आतल्या आत दाबत त्यांनी रुबिनाचा मृतदेह तिथून चोरण्याचा निर्णय घेतला!
रुबिनाचे काका मिनोई म्हणाले, मृतदेह चोरण्याशिवाय दुसरा पर्यायच आमच्यासमोर नव्हता. अधिकाऱ्यांनी अडवलं असते, तर त्यांनी एकतर मृतदेह परत केला नसता किंवा त्यासाठी भरमसाठ पैसे मागितले असते!
परतीच्या सात तासांच्या प्रवासाच्या दरम्यान रुबिनाची आई आणि त्यांची मोठी मुलगी कारच्या मागच्या सीटवर रुबिनाचा मृतदेह धरून बसल्या होत्या. त्यांचे कपडे रक्ताने पूर्ण भिजले होते. रुबिनाचा मृतदेह घेऊन ते घराजवळ पोहोचले, तर त्यांच्या लक्षात आलं, त्यांचे घर सुरक्षा दलांनी पूर्ण वेढलेले होते. त्यांनी कार तशीच परत फिरवली. शहराच्या बाहेर गेले. तिथे रस्त्याच्या कडेला एक खड्डा खोदला आणि तिथे त्यांनी रुबिनाचा मृतदेह पुरला!
सुरक्षारक्षकांनी रुबिनाचा मृतदेह ताब्यात घेतला असता, तर तो त्यांना पुन्हा मिळाला नसता आणि त्या मृतदेहाचे ते काय करतील, याचाही काहीच भरवसा नव्हता. त्यामुळे मृतदेह चोरल्याच्या आरोपावरून शिक्षा झाली तरी बेहत्तर, पण मृत्यूनंतर तरी रुबिनाच्या मृतदेहाची विटंबना होऊ नये, याची काळजी त्यांनी घेतली. रुबिनाच्या मृत्यूनंतर एक आठवडा उलटून गेल्यानंतरही कुटुंबाने धार्मिक रीतिरिवाजांनुसार तिच्यावर अंत्यसंस्कार केलेले नव्हते.