तालिबानच्या पत्रकार परिषदेत महिलांना 'नो एन्ट्री'; टीका होताच म्हणाले, "रोज ऑफिसमध्ये..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 18:04 IST2025-10-11T18:02:34+5:302025-10-11T18:04:24+5:30
तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी महिला पत्रकारांना पत्रकार परिषदेत येऊ न दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

तालिबानच्या पत्रकार परिषदेत महिलांना 'नो एन्ट्री'; टीका होताच म्हणाले, "रोज ऑफिसमध्ये..."
Taliban Press Conference:अफगाणिस्तानच्यातालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी सध्या भारत दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्या भारतभेटीपेक्षा जास्त चर्चा त्यांच्या पत्रकार परिषदेतील महिला पत्रकारांना प्रवेश न देण्याच्या भूमिकेची होत आहे. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना उपस्थित राहण्याची परवानगी नाकारण्यात आली, ज्यामुळे तालिबानच्या महिलांसंदर्भातील कठोर धोरणांवर पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. आता या प्रकरणावर तालिबान प्रवक्त्याचे स्पष्टीकरण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुत्ताकी यांच्या पत्रकार परिषदेसाठी जेव्हा अनेक महिला पत्रकार आणि वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधी पोहोचल्या, तेव्हा त्यांना परिषदेत सामील होण्यापासून रोखण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक यांनी तालिबानच्या नियमांचा हवाला देत, महिला पत्रकारांना प्रवेश नाकारला. या घटनेमुळे उपस्थित महिला पत्रकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी यांनीही यावरुन सरकारवर निशाणा साधला.
अफगाणिस्तानमध्ये सत्ता हाती घेतल्यापासून तालिबानने महिलांच्या शिक्षण, नोकरी आणि सार्वजनिक जीवनातील सहभागावर अनेक निर्बंध लादले आहेत. महिलांना काम करण्याची किंवा पुरुषांशिवाय बाहेर पडण्याची परवानगी नाही. अनेक महिला पत्रकारांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. मुत्ताकी यांनी भारत दौऱ्यावर असतानाही त्यांचे जुने धोरण कायम ठेवले. दुसरीकडे टीका होत असताना तालिबानने याबाबत स्पष्टीकरण दिलं आणि ही घटना अनावधानाने घडल्याचे म्हटलं.
तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी शनिवारी महिलांविरुद्ध त्यांचे कोणतेही भेदभावपूर्ण धोरण नसल्याचे सांगितले. पासची संख्या मर्यादित होती. काहींना ते मिळाले, काहींना मिळाले नाहीत. ही तांत्रिक बाब होती, असं शाहीन म्हणाले. त्यांनी हा विषय अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचे म्हटलं.
"अमीर खान मुत्ताकी अनेकदा त्यांच्या कार्यालयात महिला पत्रकारांना भेटतात. त्यांनी कदाचित गैज्या अफगाणिस्तानच्या नाहीत पण इतर देशांमध्ये राहतात अशा महिला पत्रकारांना भेटण्यास नकार दिला. पण अशा महिलांना तालिबान अधिकाऱ्यांशी भेटण्याची परवानगी आहे जर त्यांनी ड्रेस कोडचे पालन केले असेल तर. पत्रकार परिषदेतून महिलांना जाणूनबुजून वगळण्यात आले असे नाही. काही पुरुष पत्रकारांनाही वगळण्यात आले, कारण त्यांना पत्रकार परिषदेत उपस्थित राहण्यासाठी पास मिळू शकले नाहीत," अशी माहिती शाहीन यांनी दिली.
दरम्यान, महिला पत्रकारांना रोखण्याच्या या कृतीबद्दल भारतीय माध्यमांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मुत्ताकी यांच्या या कृतीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तालिबानची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न त्यांच्याच धोरणांमुळे फसला असल्याची चर्चा सुरू आहे.