अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 08:02 IST2025-10-12T08:02:14+5:302025-10-12T08:02:54+5:30
अमेरिका पुन्हा एकदा गोळीबाराने हादरली आहे. शनिवारी मिसिसिपीतील लीलँड येथील गर्दी असलेल्या ठिकाणी गोळीबार झाला.

अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
अमेरिका पुन्हा एकदा गोळीबाराने हादरली आहे. शनिवारी मिसिसिपीतील लीलँड येथील गर्दी असलेल्या ठिकाणी गोळीबार झाला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले. मिसिसिपीतील लीलँड हायस्कूलच्या होमकमिंग गेमसाठी लोक जमले असताना ही घटना घडली.
लीलँडमधील गोळीबाराबद्दल मेयर जॉन ली यांनी एक निवेदन जारी केलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये जॉन ली म्हणाले, "या घटनेने मला खूप दुःख झालं आहे. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या संवेदना आहेत आणि जखमी लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास एका मुख्य रस्त्यावर घडली, जेव्हा लोक लीलँड हायस्कूलच्या होमकमिंग गेमसाठी जमले होते."
"गोळीबारात जखमी झालेल्या चार जणांना एअरलिफ्ट करून स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आलं. गोळीबार करणारा अजूनही फरार आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत. होमकमिंग वीकेंड होता, जिथे सर्वजण मित्र, कुटुंब आणि शेजाऱ्यांसह नेहमीप्रमाणे शहराच्या मध्यभागी आनंद घेण्यासाठी जमले होते. पण याच दरम्यान अशी घटना घडली जी यापूर्वी कधीही घडली नव्हती."
"या घटनेनंतर, संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण आहे, लोक त्यांच्या घरात लपून बसले आहेत आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव ब्लॉक पार्टी रद्द केल्या आहेत. भीषण गोळीबारानंतर, मिसिसिपी सिनेटर डेरिक सिमन्स यांनी चार जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आणि म्हणाले की, १२ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. गोळीबारात जखमी झालेल्या लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.