जेमीच्या हट्टी ग्रॅण्डमाची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 03:37 PM2020-03-28T15:37:31+5:302020-03-28T15:41:08+5:30

मी अस्वस्थ आहे. तिला फुफ्फुसाचा आजार आहे. वय 88 वर्षांचं आहे. कोरोनाच्या संदर्भात या दोन्ही गोष्टी तिच्या विरोधात आहेत. तिला आणि तिच्या ‘तरुण’ मैत्रिणींना सरकारनं सक्तीनं ‘डांबून’ ठेवलं आहे म्हणून, नाहीतर ती आजही नक्कीच मॉर्निंग वॉकला गेली असती..

Jamie and her stubborn Grandma | जेमीच्या हट्टी ग्रॅण्डमाची गोष्ट

जेमीच्या हट्टी ग्रॅण्डमाची गोष्ट

Next
ठळक मुद्देतो भयकारी बोअरडम आणि असह्य एकाकीपणाचं ती काय करेल?? त्यानं तिचं मानसिक आरोग्य कायमचं डॅमेज झालं तर? मला भीती वाटतेय..

 

‘कोरोना व्हायरसनं अख्ख्या जगाला एकमेकांपासून अलग करायला सुरुवात केली असताना, याच कोरोनामुळे त्यांना जवळही आणायला सुरुवात केली आहे. कोरोनामुळे आपल्या प्रिय व्यक्तींपासून भले आपल्याला दूर व्हावं लागलं असेल, पण याच कोरोनानं त्यांना मानसिक आणि भावनिकदृष्ट्या अतिशय जवळही आणलं आहे. नाहीतर हे प्रेमाचं नातं आजवर आपण गृहीतच धरलं होतं. आपण कुठे कधी त्याचा प्रत्यक्ष उल्लेख केला होता? कधी त्यांच्याविना आपण असे कासाविस झालो होतो? पण आपली माणसं आपल्यापासून, आपल्या घरापासून, गावापासून, शहरापासून दूर असताना आता त्यांची आठवण खूपच अस्वस्थ, हळवी करते आहे.’ - अमेरिकेची, ब्रुकलिन येथील तरुण लेखिका जेमी फिल्डमन ब्लॉगवर आपली कहाणी सांगताना जणू अख्ख्या जगाचीच कहाणी मांडते. आपल्या आजीच्या आठवणींनी व्याकुळ झालेली जेमी सांगते. आता रात्रीचे 11 वाजले आहेत. हातात पास्ता घेऊन माझ्या किचनच्या खिडकीत उभी राहून तो पास्ता कसाबसा गिळण्याचा प्रयत्न मी करते आहे. सगळं आयुष्यचं जणू ‘एअरपोर्ट’सारखं स्तब्ध झालं आहे आणि रिकामा वेळ खायला उठला आहे. माझी 88 वर्षांची ग्रॅँडमा. तिच्या आठवणींनी डोळ्यांत महासागर दाटला आहे. माझ्यापासून तीस किलोमीटर अंतरावर न्यू जर्सीमध्ये; सेमी क्वॉरण्टाइनमध्ये ती आहे. दिवसभर न्यूज चॅनेल्ससमोर डोळे फोडल्यानंतर, एकामागून एक फकाफक सिगरेटी ओढल्यानंतर आणि माझ्याच आठवणींनी डोळ्यांत पाणी काढत कदाचित, कदाचित आता ती झोपली असावी. आयुष्यभर तिनं माझीच काळजी केली. वयाच्या 31व्या वर्षीही मी सिंगल आहे, माझं लग्न झालेलं नाही आणि मला कोणी बॉयफ्रेण्डही नाही, मी रोज एकटीनं सबवेनं; भुयारी मार्गानं पायी फिरते, सबवेनं जाते-येते, बसने, कॅबने बिनधास फिरते, रात्री सातनंतर अंधार पडलेला असतानाही वेळी-अवेळी केव्हाही घरी परतते. माझ्या काळजीनं तिचं काळीज कायम कुरतडत असतं. तिची ही काळजी मी कायमच हसण्यावारी नेली. पण आज तिच्या काळजीनं मी अस्वस्थ आहे. तिला फुफ्फुसाचा आजार आहे. वय 88 वर्षांचं आहे. कोरोनाच्या संदर्भात या दोन्ही गोष्टी तिच्या विरोधात आहेत. तिला आणि तिच्या ‘तरुण’ मैत्रिणींना सरकारनं सक्तीनं ‘डांबून’ ठेवलं आहे म्हणून, नाहीतर ती आजही नक्कीच मॉर्निंग वॉकला गेली असती, डॉक्टरांकडे चेकअपला गेली असती, सुपरमार्केट फिरून आली असती. दर आठवड्याची हेअर ड्रेसरची अपॉइण्टमेण्ट कॅन्सल झाल्यानं ‘मी माझ्या झिंज्यांचं काय करायचं?’ असं जेव्हा ती फोनवर विचारते, तेव्हा ती खरंच सिरिअस असते. तब्बल महिना झाला, माझी आणि तिची भेट नाही. मला तिला भेटायची भीती वाटते. कदाचित मलाच कोरोनाचा संसर्ग झाला असला तर?. मी तिला व्हीडीओ कॉल करू शकत नाही, कारण तिचा फोन साधा आहे. टेक्स्ट मेसेज करू शकत नाही, कारण तिला वाचता येत नाही. ती अजूनही ताठ आहे. वयाच्या 84व्या वर्षी तिला सक्तीनं रिटायर व्हावं लागलं, कारण ज्या डॉक्टरकडे ती कामाला होती, त्यानंच आपली प्रॅक्टिस सोडली! पण मला भीती वाटतेय, चुकून कुठल्या इन्फेक्टेड वस्तूला तिचा हात लागला आणि हात धुवायचे ती विसरली तर? किराणावाला किराणा भरताना तिच्या खूप जवळ आला तर?. समजा यातलं काहीही घडलं नाही, पण तो भयकारी बोअरडम आणि असह्य एकाकीपणाचं ती काय करेल?? त्यानं तिचं मानसिक आरोग्य कायमचं डॅमेज झालं तर? मला भीती वाटतेय. कहर म्हणजे ‘म्हातारी’ कोणाचं ऐकणार्‍यातली नाही. ती भयानक हट्टी, हेकेखोर, स्वावलंबी आणि आज, या वयातही अतिशय बॉसगिरी करणार्‍यांतली आहे.

Web Title: Jamie and her stubborn Grandma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.