हायपरसोनिक क्षेपणास्त्रांनी इराणवर होऊ शकतो हल्ला; अमेरिकेचा लष्करी हल्ल्याचा 'प्लॅन' समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 08:55 IST2026-05-02T08:53:27+5:302026-05-02T08:55:15+5:30
नेते टार्गेटवर, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांना योजना सांगितली

हायपरसोनिक क्षेपणास्त्रांनी इराणवर होऊ शकतो हल्ला; अमेरिकेचा लष्करी हल्ल्याचा 'प्लॅन' समोर
तेल अवीव/तेहरान/वॉशिंग्टन - अमेरिका पहिल्यांदाच इराणविरुद्ध हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा वापर करू शकते. अमेरिकेच्या सेंट्रल कमांड (सीईएनटीसीओएम)च्या कमांडरने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणविरुद्ध संभाव्य हल्ला करण्याच्या पर्यायांची माहिती दिली आहे.
ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी व्हाइट हाऊसच्या सिच्युएशन रूममध्ये ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत हे पर्याय सादर केले. यामध्ये असे सांगण्यात आले की, ट्रम्प यांनी पुन्हा हल्ला करण्याचा निर्णय घेतला, तर एक ‘लहान पण खूप शक्तिशाली हल्ला’ केला जाऊ शकतो. वृत्तानुसार, या हल्ल्यात इराणची उर्वरित लष्करी ताकद, त्याचे नेते आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जाऊ शकते. अमेरिकेने इराणवर आतापर्यंत केलेल्या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतरही त्या देशाने कडवी झुंज देण्याची तयारी सुरू केली आहे.
दोन हजार मैल लक्ष्य
संरक्षण मंत्रालय काही नवीन आणि प्रगत शस्त्रे वापरण्याचाही विचार करत आहे. यामध्ये ‘डार्क ईगल’ नावाच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राचाही समावेश आहे. हे क्षेपणास्त्र सुमारे २ हजार मैल दूरपर्यंत लक्ष्य साधू शकते आणि इराणच्या उर्वरित बॅलेस्टिक क्षेपणास्त्र लाँचरना लक्ष्य करू शकते. याव्यतिरिक्त, बी-१बी लांसर बॉम्बर विमानांची संख्याही या भागात वाढविण्यात येत आहे. ही विमाने मोठ्या प्रमाणात शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहेत आणि हायपरसोनिक शस्त्रेदेखील वाहून नेऊ शकतात.
मोठे अपडेट्स…
ट्रम्पची धमकी : ट्रम्प यांनी एका समाज माध्यमावर आपला फोटो शेअर करत म्हटले, वादळ पुढे सरकत आहे. याला कोणीही थांबवू शकणार नाही.
इराणचे प्रत्युत्तर : सर्वोच्च नेते मुजतबा खामेनेई म्हणाले, आम्ही हल्लेखोरांना समुद्रात बुडवून टाकू. पर्शियन गल्फमध्ये त्यांच्यासाठी कोणतीही जागा नाही.
तेलाची किंमत वाढली : गुरुवारी कच्च्या तेलाची किंमत वेगाने वाढून प्रति बॅरल सुमारे १२६ डॉलरच्या पुढे गेली. गेल्या ४ वर्षांतील ही सर्वाधिक वाढ होती.
मुजतबांच्या आरोग्यावर चर्चा: मुजतबा खामेनेई यांच्या आरोग्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. ते अद्याप कधीही सार्वजनिकरीत्या दिसले नाहीत.