इराणने निश्चित केली ४ टार्गेट, अमेरिका-इस्राइलला दणका देण्यासाठी आखली खास योजना, होतील भयंकर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 18:41 IST2026-03-28T17:44:41+5:302026-03-28T18:41:36+5:30
Iran War News: अमेरिका आणि इस्राइलमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला आज एक महिना लोटत आला आहे. या महिनाभराच्या काळात हे युद्ध एका भयंकर वळणावर पोहोचलं आहे. तसेच मिळत असलेल्या माहितीनुसार इराण आता या संघर्षाला ऊर्जा युद्धामध्ये परिवर्तित करण्याच्या रणनीतीवर काम करत आहे.

इराणने निश्चित केली ४ टार्गेट, अमेरिका-इस्राइलला दणका देण्यासाठी आखली खास योजना, होतील भयंकर परिणाम
अमेरिका इस्राइल यांनी इराणविरोधात सुरू केलेल्या संघर्षाला आज एक महिना लोटत आला आहे. या महिनाभराच्या काळात हे युद्ध एका भयंकर वळणावर पोहोचलं आहे. तसेच मिळत असलेल्या माहितीनुसार इराण आता या संघर्षाला ऊर्जा युद्धामध्ये परिवर्तित करण्याच्या रणनीतीवर काम करत आहे. त्यासाठी इराणमधील इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सने चार मोठी लक्ष्यं निश्चित केली आहेत. या माध्यमातून अमेरिका आणि इस्राइला रणनीतिक हानी पोहोचवण्याची योजना इराणने आखली आहे.
या धोरणानुसार इराणने उचललेलं पहिलं पाऊल म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी शत्रू देशांसाठी बंद करणे हे होय. या सागरी मार्गाने जगातील सुमारे २० टक्के तेलाची वाहतून होते. हा मार्ग पूर्णपणे बंद केला गेला तर याचा फटका केवळ अमेरिका आणि इस्राइललाच नाही तर जगातील अनेक देशांना बसणार आहे.
तर इराणचं दुसरं लक्ष्य आहे ते म्हणजे इस्राइलचा वीज व्यवस्था. इराणच्या योजनेनुसार इस्राइलच्या ओरोट रॉबिन, रुटेनबर्न, हागिट एश्कोल आणि दलिया या पाच प्रमुख वीज केंद्रांना लक्ष्य केलं जाऊ शकतं. या पाच केंद्रांमधून इस्राइलच्या एकूण गरजेच्या ५० टक्क्यांहून अधिक विजेची गरज भागवली जाते. त्यामुळे या वीजकेंद्रांना लक्ष्य केलं गेलं तर त्याचा इस्राइलला मोठ्या प्रमाणावर फटका बसू शकतो.
इराणचं तिसरं लक्ष्य आहे ते म्हणजे अमेरिकेचे आर्थिक हितसंबंध. येत्या काळात अमेरिकेची भागीदारी असलेल्या कंपन्या आणि योजनांना इराणकडून लक्ष्य केलं जाऊ शकतं. यामध्ये एडीएनओसी ड्रिलिंग, सौदी अरेबियाच्या अरामकोशी संबंधित प्रकल्प याबरोबरच ExxonMobil आणि Baker Hughes सारख्या कंपन्यांची भागीदारी असलेल्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केलं जाऊ शकतं.
याबरोबरच इराणचं चौथं आणि सर्वात व्यापक टार्गेट असेल ते म्हणजे आखाती देशांची ऊर्जा संरचना. ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकेचे सैनिकी तळ आहेत. अशा देशांमधील ऊर्जा केंद्रांना लक्ष्य करण्यात येऊ शकतं. यामध्ये संयुक्त अरब अमिरातीचा बरकाह अणू प्रकल्प, कतारचा उम्म अल हौल आणि रास लफ्पानसारखी ऊर्जा केंद्रं निशाण्यावर असतील. या केंद्रांवर हल्ला झाला तर पूर्ण आखातामधील वीज, पाणी आणि औद्योगिक औद्योगिक उलाढाल ठप्प होऊ शकते.
आता इराणने ही रणनीती अंमलात आणली तर त्याचे व्यापक परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्यातरी इराणकडून ही योजना अमलात आणण्यात आलेली नाही. तसेच कूटनीतिक स्तरावर चर्चा सुरू आहे. मात्र ज्या पद्धतीने दोन्ही बाजूंनी ऊर्जा संरचनांना लक्ष्य केलं जात आहे, त्यावरून परिस्थिती खूप बिघडू शकते, असे दिसत आहे.