दिवाळी सेलिब्रेशनमध्ये कोसळला; १८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा दुबईत कार्डिएक अरेस्टने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 10:12 IST2025-10-24T10:11:51+5:302025-10-24T10:12:16+5:30
दुबईत दिवाळीचं सेलिब्रेशन सुरू असतानाच १८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू झाला आहे.

दिवाळी सेलिब्रेशनमध्ये कोसळला; १८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा दुबईत कार्डिएक अरेस्टने मृत्यू
ऐन दिवाळीत दुबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुबईत दिवाळीचं सेलिब्रेशन सुरू असतानाच १८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू झाला आहे. वैष्णव कृष्णकुमार असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. त्याच्या अचानक मृत्यूने कुटुंबीयांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, वैष्णव कृष्णकुमार हा मिडलसेक्स युनिव्हर्सिटी दुबई येथे बीबीए मार्केटिंगच्या पहिल्या वर्षात शिकत होता. मंगळवारी दुबई इंटरनॅशनल ॲकॅडमिक सिटी येथे दिवाळी सेलिब्रेशनमध्ये तो सहभागी झाला होता. सेलिब्रेशनदरम्यान तो अचानक खाली कोसळला. त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू झाल्याचं सांगितलं.
वैष्णव कृष्णकुमार हा यूएई गोल्डन व्हिसाधारक होता. मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवला हृदयासंबंधित कोणताही त्रास नव्हता, त्यामुळे त्याच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. दुबई पोलीस फॉरेन्सिक विभागाने या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू केली आहे. वैष्णवचे कुटुंब मूळचं केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यातील चेननिथला येथील आहे. त्याचे वडील गेली २० वर्षांहून अधिक काळ दुबईत कार्यरत आहेत.
वैष्णवचे आई-वडील, व्ही. जी. कृष्णकुमार आणि विधू कृष्णकुमार, तसेच धाकटी बहीण वृष्टी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाच्या इच्छेनुसार, वैष्णवचा मृतदेह केरळमधील मूळ गावी अंत्यसंस्कारासाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वैष्णव हा अत्यंत प्रेमळ आणि हूशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता.