इस्लामाबाद - पाकिस्तानसोबत युद्धाच्या परिस्थितीत भारत अशा देशांची ओळख पटवत आहे जे स्वत:ला भारताचे मित्र मानतात. त्याशिवाय अशा शत्रूंना शोधले जात आहे जे थेट पाकिस्तानसोबत जाऊन उभे राहतील. भारत कुठल्याही क्षणी पाकिस्तानवर हल्ला करू शकते असा दावा पाक मंत्री करत आहेत. त्यातच पाकिस्तानला कराची आणि लाहोरबाबत चिंता सतावत आहे. त्यातच ज्या विनाशकारी भूकंपानंतर भारताने तुर्कीला मदत केली, त्यांनीच पाकच्या कराची पोर्टला युद्धनौका आणून उभी केली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तुर्कीने मिलिट्री प्लेनने पाकिस्तानला युद्ध साहित्य पाठवले होते. त्यानंतर आता कराची पोर्टवर त्यांच्या नौदलाची युद्धनौका उभी केली आहे. एंटी सबमरीन तंत्रज्ञानाच्या या तुर्कीश शिपचं नाव TCG BUYUKADA असं आहे. ही युद्धनौका कराचीला पोहचताच पाकिस्तानी सैन्य खुश झाले आहे. तुर्किश युद्धनौका दोन्ही देशातील नौदलाला सागरी सहकार्य करेल असं पाक नौदलाने म्हटलं. तुर्की देशाने आजपर्यंत कायम पाकिस्तानची बाजू घेतली आहे. कराचीत तुर्की नौदलाचे अधिकारी पाकिस्तानी सैनिकांसोबत संवाद साधतील.
माहितीनुसार, तुर्की आणि पाकिस्तानी नौदल एकत्रितपणे युद्धसराव करणार आहेत. २२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक यांच्यात तणाव वाढला आहे. त्यात अरबी समुद्रात दोन्ही देशांनी नौदलाचा अभ्यास केला. आता तुर्की उघडपणे पाकिस्तानसोबत उभा राहिला आहे. त्यामुळे पुढील काळात भारत आणि तुर्की यांच्यातील संबंध बिघडण्याची शक्यता आहे. तुर्कीविरोधात कठोर निर्णय घ्यावेत अशी मागणी आतापासून होऊ लागली आहे. एका रिपोर्टनुसार, तुर्की पाकिस्तानचा दुसरा सर्वात मोठा सैन्य शस्त्राचा पुरवठा करणारा देश आहे. तो ड्रोन, युद्धनौका, एंटी टँक मिसाईलसह पाकिस्तानला F16 अपडेट करण्यास मदत करत आहे.
दरम्यान, मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनीही पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सूरात सूर मिसळले आहेत. याआधीही मलेशियाने काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यावरून पाकिस्तानला साथ देत भारतावर टीका केली होती. त्यावेळी भारताने मलेशियातून ऑयल आयात घटवले, त्याचा परिणाम तिथल्या अर्थव्यवस्थेवर झाला. भारताने धडा शिकवल्यापासून मलेशियाने काही वर्ष काश्मीरवर मौन बाळगले परंतु आता त्याने पुन्हा बोलण्यास सुरुवात केली आहे. पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष चौकशी व्हावी या पाकिस्तानी मागणीला मलेशियाचा पाठिंबा असल्याचं सांगण्यात येते.