भारत-नेदरलँड्स यांच्यात १७ करारांवर स्वाक्षऱ्या; पंतप्रधान मोदी-रॉब जेटेन यांच्यात धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 05:31 IST2026-05-18T05:31:20+5:302026-05-18T05:31:36+5:30

दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी पश्चिम आशियातील परिस्थितीबद्दल आणि याच्या व्यापक गंभीर परिणामांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. या तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा आणि व्यापार जाळ्यांमध्ये सध्या प्रचंड व्यत्यय येत आहे.

India-Netherlands sign 17 agreements; PM Modi-Rob Zeten discuss strategic partnership | भारत-नेदरलँड्स यांच्यात १७ करारांवर स्वाक्षऱ्या; पंतप्रधान मोदी-रॉब जेटेन यांच्यात धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा

भारत-नेदरलँड्स यांच्यात १७ करारांवर स्वाक्षऱ्या; पंतप्रधान मोदी-रॉब जेटेन यांच्यात धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा

हेग : सध्या सुरू असलेल्या जागतिक भू-राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत आणि नेदरलँड्सने आपसांतील द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर संरक्षण, महत्त्वपूर्ण खनिजे आणि इतर प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी शनिवारी १७ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी पश्चिम आशियातील परिस्थितीबद्दल आणि याच्या व्यापक गंभीर परिणामांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. या तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा आणि व्यापार जाळ्यांमध्ये सध्या प्रचंड व्यत्यय येत आहे.
एका संयुक्त निवेदनानुसार, मोदी आणि जेटेन यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जागतिक व्यापारी जहाजांच्या मुक्त संचार आणि हालचालीचे आवाहन केले. या भागातील कोणत्याही निर्बंधांना दोन्ही देशांनी विरोध केला. रशियासोबतच्या संघर्षामुळे प्रभावित झालेल्या युक्रेनमधील परिस्थिती आणि प्रादेशिक सुरक्षा घडामोडींवरही त्यांनी चर्चा केली. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा आणि स्वरूपांचा निःसंदिग्धपणे निषेध केला.

दोन्ही देशांत मैत्रीपर्व 
मोदी-जेटेन चर्चेनंतर दोन्ही देशांनी व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, सेमीकंडक्टर, अवकाश, एआय व क्वांटम कंप्युटिंगसह महत्त्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रातील संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सामरिक भागीदारी आराखडा’ सुरू केला.
हरित हायड्रोजनच्या विकासावरील भारत-नेदरलँड्स आराखड्याला दोन्ही देशांनी मंजुरी दिली. युरोपमधील भारताच्या सर्वांत मोठ्या व्यापारी केंद्रांपैकी एक असलेल्या नेदरलँड्ससोबतचा द्विपक्षीय व्यापार २०२४-२५ मध्ये २७.८ अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.  

प्रसिद्ध धरणाला दिली भेट
पंतप्रधान मोदी यांनी नेदरलँड्स दौऱ्यात पंतप्रधान रॉब जेटेन यांच्यासोबत रविवारी प्रसिद्ध अफस्लुइटडिझ्क धरणाला भेट दिली. दोन्ही जल व्यवस्थापन आणि हवामानानुसार आवश्यक पायाभूत सुविधांमध्ये दोन्ही देशांतील सहकार्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट आयोजित करण्यात आली होती.
यानंतर मोदी स्वीडनला रवाना झाले.  भेटीनंतर मोदी यांनी म्हटले आहे की, जल व्यवस्थापनात नेदरलँड्सने अभूतपूर्व काम केले आहे.  सिंचन, पूर नियंत्रण आणि अंतर्गत जलमार्गांच्या जाळ्याच्या विस्तारात मदतीच्या दृष्टीने भारतात आधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी वचनबद्ध आहोत.

Web Title : भारत-नीदरलैंड्स में 17 समझौतों पर हस्ताक्षर; रणनीतिक साझेदारी पर चर्चा

Web Summary : भारत और नीदरलैंड्स ने रक्षा, खनिजों और प्रौद्योगिकी पर केंद्रित 17 समझौतों के साथ संबंधों को मजबूत किया। प्रधानमंत्रियों मोदी और रुट्टे के बीच पश्चिम एशिया तनाव और यूक्रेन सहित वैश्विक चिंताओं पर चर्चा हुई। एक रणनीतिक साझेदारी ढांचे का उद्देश्य व्यापार और सहयोग को बढ़ावा देना है।

Web Title : India, Netherlands Sign 17 Agreements; Strategic Partnership Discussed

Web Summary : India and the Netherlands strengthened ties with 17 agreements focusing on defense, minerals, and technology. Discussions between Prime Ministers Modi and Rutte addressed global concerns, including West Asia tensions and Ukraine. A strategic partnership framework aims to boost trade and collaboration in key sectors.