मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 06:21 IST2026-05-18T06:21:13+5:302026-05-18T06:21:22+5:30
काही तासातच आरोपीला ठोकल्या बेड्या; लोकलची वाट पाहत उभी असताना घडली घटना

मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण रेल्वे यार्डात अहिल्यानगरच्या १४ वर्षीय मुलीवर शनिवारी एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच काही तासांत कल्याण जीआरपी पोलिसांनी तातडीने कारवाई करून सौरभ सोनवणे (२३) याला बेड्या ठोकल्या. दरम्यान, न्यायालयाने सौरभला २१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडित मुलगी मामाला भेटण्यासाठी अहिल्यानगरहून कल्याण बसस्थानकात शनिवारी संध्याकाळी आली होती. पुढे तिला खोपोलीला जायचे असल्याने ती कल्याण रेल्वेस्थानकात लोकलची वाट पाहत उभी होती. त्याचवेळी सौरभ तिच्याजवळ आला आणि पीडितेकडील मोबाइल जबरदस्तीने हिसकावून घेतला. तिने मोबाइल परत मागितल्यानंतर ‘मोबाइल हवा असेल तर माझ्यासोबत पोलिस ठाण्यात चल’, असे सांगितले. घाबरलेली पीडिता त्याच्यासोबत गेली. सौरभने तिला कल्याण रेल्वे यार्ड परिसरात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यावर पळ काढला. घटनेनंतर पीडितेने कल्याण रेल्वे पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तात्काळ लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बळाची तपास पथके तयार करण्यात आली. रेल्वेस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली व काही तासांत त्याला ताब्यात घेतले. सौरभ सोनवणे कल्याण पूर्वेच्या सिद्धार्थनगर झोपडपट्टीत राहातो.
मुश्कीलीने सुटका करून घेतली : पीडितेला घेऊन सौरभ रेल्वे यार्डाच्या दिशेने गेला. तरुणीला आपण पोलीस ठाण्यात जात आहोत असे वाटले. रेल्वे यार्डात प्रवेश केल्यानंतर सौरभने तिला जबरदस्तीने रेल्वे यार्डात आडोशाच्या ठिकाणी नेले. तिच्याशी जबरदस्तीने लगट करत लैंगिक अत्याचार सुरू केला. घाबरलेल्या पिडीतेने आरडाओरडा सुरू केल्याने सौरभने तिचे तोंड दाबून ठेवले. या भयंकर प्रसंगातून तिने मुश्कीलीने सुटका करून घेतली. दरम्यान, रेल्वेस्थानकांसारख्या ठिकाणीही आता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
डोंबिवलीत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; दोघीही गर्भवती राहिल्यानंतर झाला उलगडा
डोंबिवलीत दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, दोन्ही मुली गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. या प्रकरणी मानपाडा आणि रामनगर पोलिसांनी लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोघांना रविवारी अटक केली.
पहिल्या घटनेत आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक : मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी काजू निषाद (वय २३) हा उत्तर प्रदेशात पसार झाला होता. पीडित मुलगी गरोदर राहिल्याचे समोर आल्यानंतर पीडित मुलीसोबत कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तांत्रिक तपास करत राजूला उत्तर प्रदेशातून पकडले.
दुसऱ्या घटनेत प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार : रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शुभम सरोज (१९) याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. शुभम व्हिडिओग्राफर आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्याचे समोर आल्यावर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत शुभमला अटक केली.