युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 18:52 IST2025-04-28T18:51:22+5:302025-04-28T18:52:13+5:30
Blackout in Spain Portugal Europe: सध्या यामागील कारण शोधले जात आहे. हा सायबर हल्ला असू शकतो, असे मानले जात आहे.

युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
Blackout in Spain Portugal Europe: अचानक युरोपातील अनेक देशांमध्ये वीजेचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. स्पेन आणि पोर्तुगालसह अनेक भागात मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाला, ज्यामुळे हवाई सेवांपासून ते मेट्रोसारख्या विविध वाहतुकीच्या सोयींवर परिणाम झाला आहे. सुरुवातीला माद्रिद ते लिस्बन पर्यंतचा मोठा भाग अंधारात होता. या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी दोन्ही देशांनी तात्काळ प्रोटोकॉल लागू केला आहे. सध्या यामागील कारण शोधले जात आहे. हा सायबर हल्ला असू शकतो, असे मानले जात आहे.
स्पेनच्या राष्ट्रीय ग्रिड ऑपरेटर 'रेड इलेक्ट्रिका'ने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, देशभरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी क्षेत्रातील कंपन्यांच्या सहकार्याने अनेक ठोस पावले उचलली जात आहेत. दरम्यान, पोर्तुगालच्या ग्रिड ऑपरेटर 'ई-रेड्स' ने सांगितले की युरोपियन पॉवर ग्रिडमधील समस्येमुळे हे संकट उद्भवले आहे. सुरुवातीच्या तपासात, व्होल्टेज असंतुलन हे वीज प्रणाली पूर्णपणे कोलमडण्याचे मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे.
'ब्लॅकआउट'मुळे सारंकाही ठप्प
या ब्लॅकआउटमुळे ट्रॅफिक लाईट बंद पडले आणि मेट्रो सेवा थांबल्या, ज्यामुळे रस्त्यांवर गोंधळ उडाला. रुग्णालयांमधील अत्यावश्यक सेवा बॅकअप जनरेटरच्या मदतीने चालवल्या जात आहेत, परंतु अधिकाऱ्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना संगणक बंद करण्याचे आणि वीज वाचवण्यासाठी इतर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या तरी हे संकट किती काळ राहील हे स्पष्ट नाही. परिस्थिती हाताळण्यासाठी स्पेनमध्ये एक आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे.
सायबर हल्ल्याची शक्यता
स्पॅनिश अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, ब्लॅकआउटचे कारण आतापर्यंत सायबर हल्ला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची सखोल चौकशी केली जात आहे. याआधीही युरोपमध्ये किरकोळ तांत्रिक बिघाडांमुळे मोठे ब्लॅकआउट झाले आहेत. २००३ मध्ये, स्वित्झर्लंडमध्ये एका झाडामुळे वीज तार तुटल्याने संपूर्ण इटली अंधारात बुडाली होती. त्यामुळे यावेळीही तांत्रिक समस्या किंवा सायबर हल्ला या दोन्ही शक्यता लक्षात घेऊन तपास केला जात आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, स्पॅनिश प्रशासनाने सर्वसामान्यांना आवाहन केले आहे की त्यांनी आपत्कालीन सेवांना अनावश्यक कॉल करू नयेत, कारण टेलिफोन सेंटर आधीच कॉलने भरलेले आहेत. युरोपियन कमिशनने गेल्या अनेक वर्षांपासून देशांमधील ऊर्जा प्रणालीच्या चांगल्या एकत्रीकरणाच्या गरजेवर भर दिला आहे, परंतु प्रगती मंदावली आहे. सध्याच्या संकटाने युरोपला पुन्हा एकदा या दिशेने गांभीर्याने विचार करण्यास भाग पाडले आहे.