नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 20:58 IST2025-10-05T20:57:33+5:302025-10-05T20:58:45+5:30
या आपत्तीत किमान 51 जणांचा मृत्यू झाल्याचे तर अनेकजण बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.

नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
नेपाळच्या विविध भागांत शनिवारी रात्रीपासूनच मुसळधार पावस सुरू आहे. यामुळे झालेल्या भूस्खलनामुळे आणि आलेल्या पुरांमुळे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीत किमान 51 जणांचा मृत्यू झाल्याचे तर अनेकजण बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.
सशस्त्र पोलिस दलाचे (APF) प्रवक्ते कालिदास धौबाजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोशी प्रांतातील इल्लम जिल्ह्यात गेल्या 48 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात किमान 37 जणांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी करणे आणि व्यवस्थापन प्राधिकरण (NDRRMA) नुसार, या मृतांमध्ये, देउमाई आणि माईजोगमाई नगरपालिका हद्दीत प्रत्येकी आठ, इल्लम नगरपालिका आणि संदकपूर ग्रामीण नगरपालिका हाद्दीत प्रत्येकी सहा, मंगसेबुंगमध्ये तीन आणि फाकफोकथुम गावातील एका व्यक्तींचा समावेश आहे. याशिवाय, उदयपूरमध्ये दोन आणि पंचथरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
याशिवाय, रौतहटमध्ये वीज कोसळून तीन, तर खोतांग जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला. पंचथरमध्ये पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांमुळे झालेल्या एका रस्ते अपघातात सहा जणांचा बळी गेला. रसुवा जिल्ह्यातील लांगटांग संरक्षण क्षेत्रात नदीच्या पुरात चार जण वाहून गेले. याच बरोबर लांगटांग भागातच 16 जणांच्या ट्रेकिंग गटातील चार जणांचाही समावेश आहे. तसेच, इल्लम, बारा आणि काठमांडू येथे पुराच्या घटनांमध्ये प्रत्येकी एक जण बेपत्ता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दुःख -
नेपाळमधील या आपत्तीसंदर्भात, एक्सवरून शोक व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले, “नेपाळमधील मुसळधार पावसामुळे झालेली जीवित आणि वित्तहानी अत्यंत दुखद आहे. या संकटात भारत नेपाळी नागरिकांसह आणि सरकारसोबत खांद्याला खांदा लावून उभा आहे. मित्रराष्ट्र आणि तात्काळ मदत पुरवणारा शेजारी म्हणून भारत कोणत्याही आवश्यक सहाय्यासाठी पूर्णपणे तयार आहे.”
The loss of lives and damage caused by heavy rains in Nepal is distressing. We stand with the people and Government of Nepal in this difficult time. As a friendly neighbour and first responder, India remains committed to providing any assistance that may be required.
— Narendra Modi (@narendramodi) October 5, 2025
भारताने यापूर्वी 2015 च्या भूकंपात (8,962 मृत्यू, 21,952 जखमी) आणि 2020 च्या पूर संकटात (196 मृत्यू, 188 जखमी) नेपाळला महत्त्वपूर्ण मदत केली होती. सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय संबंधांमुळे दोन्ही देश संकटकाळात एकमेकांना मदत करत असतात.