अमेरिकन राजकारणातील 'कोल्ड वॉर' दावोसमध्ये! ट्रम्प प्रशासनाने गॅविन न्यूसम यांना भाषणापासून रोखले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 10:20 IST2026-01-22T10:20:32+5:302026-01-22T10:20:59+5:30
Gavin Newsom Davos Trump News: कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी ट्रम्प प्रशासनावर दावोस परिषदेत दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. 'USA House' मध्ये त्यांना प्रवेश नाकारल्याने वाद पेटला आहे.

अमेरिकन राजकारणातील 'कोल्ड वॉर' दावोसमध्ये! ट्रम्प प्रशासनाने गॅविन न्यूसम यांना भाषणापासून रोखले?
दावोस/कॅलिफोर्निया: स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत अमेरिकन राजकारणातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. कॅलिफोर्नियाचे डेमॉक्रॅटिक गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी खळबळजनक आरोप केला आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने दबाव टाकून त्यांना 'USA House' मधील एका नियोजित कार्यक्रमात बोलण्यापासून रोखले आहे.
गॅविन न्यूसम यांना 'फॉर्च्युन' मासिकाने एका 'फायरसाइड चॅट'साठी (संवाद सत्रासाठी) अधिकृत पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. हा कार्यक्रम अमेरिकेच्या अधिकृत पॅव्हेलियनमध्ये होणार होता. मात्र, न्यूसम यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, शेवटच्या क्षणी त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.
न्यूसम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर संताप व्यक्त करताना म्हटले की, "कॅलिफोर्निया हा अमेरिकेचाच भाग आहे. एका संवादाला इतके घाबरणे हे अत्यंत कमकुवतपणाचे लक्षण आहे."
ट्रम्प प्रशासनाचे प्रत्युत्तर
न्यूसम यांच्या आरोपांवर व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या अॅना केली यांनी सडकून टीका केली आहे. त्यांनी न्यूसम यांना 'थर्ड रेट गव्हर्नर' (दुय्यम दर्जाचे गव्हर्नर) संबोधले आणि म्हटले की, "कॅलिफोर्नियातील स्वतः निर्माण केलेल्या समस्या सोडवण्याऐवजी ते स्वित्झर्लंडमध्ये काय करत आहेत, हे कोणालाही माहित नाही."
वादाची पार्श्वभूमी
गॅविन न्यूसम हे ट्रम्प यांच्या धोरणांचे कट्टर टीकाकार मानले जातात. विशेषतः ट्रम्प यांची 'ग्रीनलँड' ताब्यात घेण्याची मागणी आणि हवामान बदलाबाबतची धोरणे यावर न्यूसम यांनी दावोसमध्ये कडक टीका केली होती. याच टीकेचा वचपा काढण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने त्यांना रोखल्याचा दावा केला जात आहे.