"बेडकाचं विष..."; 'नवलनी' यांच्या मृत्यूवर जर्मनी-फ्रान्स-UK भडकले; रशियन सरकारवर गंभीर आरोप, केला मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 21:56 IST2026-02-14T21:55:39+5:302026-02-14T21:56:40+5:30
युके, फ्रान्स आणि जर्मनीसह पाच युरोपीय देशांनी नवलनी यांच्या मृत्यूप्रकरणी रशियन सरकारला जबाबदार धरले असून, विष देऊन त्यांची हत्या केल्याचा गंभीर आरोप पुतिन सरकारवर केला आहे...

"बेडकाचं विष..."; 'नवलनी' यांच्या मृत्यूवर जर्मनी-फ्रान्स-UK भडकले; रशियन सरकारवर गंभीर आरोप, केला मोठा दावा
रशियाचे विरोधी पक्षनेते ॲलेक्सी नवलनी यांच्या मृत्यूवरून आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. युके, फ्रान्स आणि जर्मनीसह पाच युरोपीय देशांनी नवलनी यांच्या मृत्यूप्रकरणी रशियन सरकारला जबाबदार धरले असून, विष देऊन त्यांची हत्या केल्याचा गंभीर आरोप पुतिन सरकारवर केला आहे.
धक्कादायक म्हणजे, या देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांनी नवलनी यांच्या शरीरात 'एपिबेटिडाइन' (Epibatidine) हे घातक विष आढळल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, हे विष दक्षिण अमेरिकेतील विषारी बेडकांमध्ये आढळते. जे नैसर्गिकदृष्ट्या रशियात आढळत नाही.
'ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स'कडे (OPCW) तक्रार करणार -
युनायटेड किंगडमच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हणण्यात आले आहे की, "रशियन सरकारने नवलनी यांच्या वाढत्या प्रभावाच्या भीतीपोटी, त्यांना लक्ष्य करण्यासाठी या प्राणघातक टॉक्सिनचा वापर करण्यात आला." संबंधित युरोपीय देशांनी एक संयुक्त निवेदन जारी करत, "रशियाकडे हे विष देण्याची पद्धत, हेतू आणि संधी तिन्ही गोष्टी उपलब्ध होत्या आणि आपण, रासायनिक शस्त्र कराराच्या उल्लंघनासंदर्भात रशियाविरुद्ध 'ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स'कडे (OPCW) तक्रार करत आहोत", असे म्हटले आहे.
"माझ्या पतीची हत्या, आता विज्ञानानं सिद्ध केली..." -
यासंदर्भात शनिवारी म्युनिक सुरक्षा परिषदेत बोलताना, युलिया नवलनाया यांनी अत्यंत भावूक होत, अतिशय आक्रमकपणे आपले म्हणणे मांडले. त्या म्हणाल्या, "दोन वर्षांपूर्वी मी याच मंचावरून व्लादिमीर पुतिन यांनी माझ्या पतीची हत्या केल्याचा आरोप केला होता. तेव्हा ते केवळ शब्द होते. मात्र आज ते विज्ञानाने सिद्ध केले आहे. २०२४ मध्ये आर्क्टिक जेलमध्ये झालेली ती हत्या आता वैज्ञानिक पुराव्यांसह जगासमोर आली आहे."