फ्रान्सने रोखले ३०३ भारतीय प्रवासी असलेले विमान; पोलिस अधिकाऱ्यांकडून चौकशी, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 12:20 AM2023-12-23T00:20:36+5:302023-12-23T00:21:14+5:30

पॅरिस पासून ते दिल्ली पर्यंत विमान उतरवण्याच्या गोष्टीवरून चर्चा अन् खलबतं

France grounds plane carrying over 300 Indians for human trafficking read details | फ्रान्सने रोखले ३०३ भारतीय प्रवासी असलेले विमान; पोलिस अधिकाऱ्यांकडून चौकशी, कारण काय?

फ्रान्सने रोखले ३०३ भारतीय प्रवासी असलेले विमान; पोलिस अधिकाऱ्यांकडून चौकशी, कारण काय?

India France News: भारतीय नागरिकांना घेऊन निकाराग्वाला जाणारे विमानफ्रान्सने रोखल्याची माहिती आहे. या विमानात ३०३ भारतीय नागरिक आहेत. या विमानाचा मानवी तस्करीसाठी वापर केला जात असल्याचा संशय फ्रेंच यंत्रणांना आहे. एका निनावी सूचनेवरून हे विमान ताब्यात घेण्यात आल्याचे फ्रेंच वकिलांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताने फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. मॅक्रॉन यांनी स्वतः ट्विट करून हे निमंत्रण स्वीकारल्याची माहितीही दिली आहे. अशातच ही घटना समोर आली आहे.

फ्रेंच अधिकारी काय म्हणाले?

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, भारतातून निकाराग्वाला जाणारे विमान मानवी तस्करीसाठी वापरले जाऊ शकते अशी माहिती मिळाली. या विमानाने संयुक्त अरब अमिरातीहून उड्डाण घेतले होते. या प्रवाशांच्या प्रवासाच्या परिस्थिती आणि हेतूंबाबत न्यायालयीन चौकशी सुरू झाल्याची माहिती फ्रेंच अधिकाऱ्यांनी दिली आहे. मानवी तस्करीच्या संशयावरून अधिकारी तपास करत होते.

फ्लाइट बद्दल काय माहिती?

दुबईहून उड्डाण घेतलेले हे रोमानियन चार्टर कंपनीचे विमान आहे. पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर ते तांत्रिक कारणास्ताव एका छोटेखानी विमानतळावर उतरवण्यात आले. "प्रवाशांना शक्य तितक्या सर्वोत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, वॅटी विमानतळावरील रिसेप्शन हॉलचे वैयक्तिक बेड असलेल्या वेटिंग लाऊंजमध्ये रूपांतर करण्यात आले आहे," असे पोलिसांनी सांगितले. या भारतीय नागरिकांना आणखी किती दिवस ठेवण्यात येईल किंवा त्यांना भारतात पाठवण्याची तयारी आहे का, हे फ्रेंच अधिकाऱ्यांनी अद्याप सांगितलेले नाही.

निकाराग्वा आणि मानवी तस्करी यांचा काय संबंध आहे?

निकाराग्वा हा मध्य अमेरिकन देश आहे. निकाराग्वाच्या उत्तरेस होंडुरास, पूर्वेस कॅरिबियन, दक्षिणेस कोस्टा रिका आणि पश्चिमेस प्रशांत महासागर आहे. बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करणाऱ्यांसाठी हा देश नंदनवन समजला जातो. दरवर्षी हजारो अवैध स्थलांतरित या देशातून अमेरिका-मेक्सिको सीमेवर पोहोचतात. बेकायदेशीर स्थलांतरितांनाही या मार्गावर अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते, ज्यात भौगोलिक स्थान आणि चोरी, दरोड्यासारख्या घटनांचा समावेश होतो. निकाराग्वामध्ये या स्थलांतरितांवर विशेष तपास केला जात नाही.

Web Title: France grounds plane carrying over 300 Indians for human trafficking read details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.