LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 18:57 IST2025-10-20T18:56:59+5:302025-10-20T18:57:33+5:30
Fire Accident in Sea: या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.

LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
Fire Accident in Sea: यमनच्या अदन किनाऱ्याजवळ शनिवारी एक मोठा सागरी अपघात घडला. एम.व्ही. फाल्कन (MV Falcon) या जहाजावर मोठा स्फोट झाला आणि काही मिनिटांतच संपूर्ण जहाजाला आग लागली. हे जहाज एलपीजी (Liquefied Petroleum Gas) घेऊन अदन बंदरातून जिबूतीकडे निघाले होते.
स्फोटानंतर जहाजाला लागली भीषण आग
प्राथमिक माहितीनुसार, जहाजावर स्फोट झाल्यानंतर अंदाजे 15 टक्के भाग पूर्णपणे जळून खाक झाला. स्फोटानंतर कॅप्टनने तात्काळ मदतीसाठी आपत्कालीन संदेश पाठवला. त्यानंतर EUNAVFOR Aspides (युरोपियन युनियन नौदल) ने तातडीने शोध व बचाव मोहीम सुरू केली.
Gulf of Aden, October 19, 2025. Fire onboard LPG Tanker MV FALCON – SAR Operations Underway. THIRD UPDATE
— EUNAVFOR ASPIDES (@EUNAVFORASPIDES) October 19, 2025
Read more: https://t.co/Xhi7I9H6n6pic.twitter.com/VI5pyif0oT
26 खलाशींपैकी 24 वाचवले, दोन बेपत्ता
EUNAVFOR Aspides ने अधिकृत निवेदनात सांगितले की, “MV Falcon वर एकूण 26 खलाशी होते. त्यापैकी 24 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे, तर दोन अजूनही बेपत्ता आहेत. वाचवलेल्या खलाशांपैकी 23 भारतीय नागरिक असून एक युक्रेनचा नागरिक आहे.”
वाचवलेले खलाशी जिबूतीच्या किनाऱ्यावर कोस्ट गार्डकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. त्यांपैकी काहींना किरकोळ भाजल्या गेलेल्या जखमांवर उपचार सुरू आहेत.
अपघातामागील कारण अजून अस्पष्ट
या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. प्राथमिक तपासानुसार, LPG गॅस लीक होऊन स्फोट झाला असावा, अथवा इंजिन रूममधील तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असावी, असे दोन संभाव्य अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. अधिकृत चौकशी सुरू आहे.