सोमालीया संसदेवर अतिरेकी हल्ला

By Admin | Updated: May 25, 2014 04:17 IST2014-05-25T04:10:02+5:302014-05-25T04:17:19+5:30

सोमालिया संसदेवर अतिरेक्यांनी चढविलेल्या भीषण हल्ल्यात १० जण ठार झाले असून ‘अल-शबाब’ या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Extremist attack on Somalia Parliament | सोमालीया संसदेवर अतिरेकी हल्ला

सोमालीया संसदेवर अतिरेकी हल्ला

मोगादिशू: सोमालिया संसदेवर अतिरेक्यांनी चढविलेल्या भीषण हल्ल्यात १० जण ठार झाले असून ‘अल-शबाब’ या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हल्ला आणि चकमकीची भीषणता पाहता मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. संसद परिसराच्या प्रवेशद्वाराबाहेर या अतिरेक्यांची कार बॉम्बचा भीषण स्फोट केला. त्यानंतर आत्मघाती अतिरेक्यांनी गोळीबार करीत चढाई केली. स्फोटासोबत गोळीबाराच्या आवाजाचे संसद परिसर दणाणला. गोळीबार करीत अतिरेकी संसदेच्या मुख्य इमारतीनजीक पोहोचताच त्या ठिकाणी सुरक्षा दलाने अतिरेक्यांच्या पूर्ण ताकदीनिशी प्रतिकार केला. यावेळी उडालेल्या भीषण चकमकीत चार पोलिस अधिकारी आणि सहा अतिरेकी ठार झाल्याचे सांगण्यात येते. संसदीय इमारतीच्या परिसरात गोळीबार चालूच असून संसद सदस्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याचे कर्नल मोहम्मद दहीर यांनी सांगितले. तथापि, या हल्ल्यात दोन खासदार जखमी झाल्याचे बीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे. तथाकथित सोमलिया संसद म्हणून लष्कराचा अड्डा असून आमचे योद्धा त्या ठिकाणी पवित्र कार्य पार पाडीत आहेत, असे अल-शबाबच्या प्रवक्त्याने सांगितले. अल-शबाब या संघटनेच्या अतिरेक्यांना २०११ मध्ये मोगादिशूमधून पिटाळण्यात आले होते. परंतु, ही संघटना अधून-मधून मोगादिशू आणि इतर शहरांत हल्ले चढवून आपले अस्तित्व टिकवून आहे. १९९१ मध्ये येथील सरकार कोसळल्यापासून सोमालियात सातत्याने चकमकी घडत आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Extremist attack on Somalia Parliament