प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 05:37 IST2025-07-21T05:37:32+5:302025-07-21T05:37:43+5:30
नवी दिल्ली : प्रचंड उष्म्याच्या संपर्कात येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात दीड वर्षांपर्यंत घट होऊ शकते. कारण हवामान बदलाचा शिक्षणावर ...

प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
नवी दिल्ली : प्रचंड उष्म्याच्या संपर्कात येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात दीड वर्षांपर्यंत घट होऊ शकते. कारण हवामान बदलाचा शिक्षणावर थेट परिणाम होत आहे व पुढील दशकांमध्येही याचा प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे एका जागतिक अहवालात म्हटले आहे.
तापमान, वणवा, पूर, वादळ, दुष्काळ, आजार आणि समुद्राची वाढती पातळी हे घटक शिक्षणावर परिणाम करीत आहेत. अहवालात म्हटले आहे की, बहुतांश निम्न व मध्यम उत्पन्न असणारे देश दरवर्षी हवामान बदलांमुळे तणावांना सामोरे जात आहेत. यामुळे शिक्षणाचे नुकसान व विद्यार्थीशाळा सोडण्याच्या शक्यता वाढत आहेत. युनेस्को व कॅनडातील सस्केचवान विद्यापीठाद्वारे संकलित माहितीचा अहवाल तयार करण्यात आला आहे.
अहवालातील धक्कादायक निष्कर्ष
प्रचंड उष्म्याच्या संपर्कात आल्यामुळे मुलांच्या शैक्षणिक जीवनाची हानी झाली. १९६९ ते २०१२च्या दरम्यान २९ देशांतील जनगणना व जलवायूसंबंधी आकडेवारीचा संबंध जोडला असता, गर्भात राहिल्यापासून ते प्रारंभिक जीवनकाळात सरासरीपेक्षा अधिक तापमानाच्या संपर्कात आल्याचा संबंध विशेष रूपाने आग्नेय आशियामध्ये शालेय शिक्षणाच्या वर्षांमध्ये घट पाहावयास मिळते.
सरासरी दोन अंश अधिक तापमानाचा सामना करणाऱ्या बालकांना १.५ वर्ष शालेय शिक्षण कमी मिळेल. मागील २० वर्षांतील नैसर्गिक घटनांमुळे किमान ७५ टक्के वेळा शाळा बंद आहेत. यामुळे ५० लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोक प्रभावित झाले आहेत.
उच्च तापमानामुळे चीनमध्ये उच्चस्तरीय परीक्षेत विद्यार्थ्यांच्या निकालावर प्रतिकूल परिणाम पडत आहे. हायस्कूल व कॉलेज, पदवीचे प्रवेश कमी झाले आहेत. जकार्तामध्ये २०१३च्या पुरानंतर शाळांमधील प्रवेश विस्कळीत झाला होता. २०१९मध्ये नैसर्गिक घटनांमुळे सर्वांत जास्त प्रभावित होणाऱ्या १० देशांमध्ये ८ निम्न-मध्यम उत्पन्न असणारे देश आहेत.