'इंडिया गेट'च्या प्रेमात पडले डोनाल्ड ट्रम्प! फोटो शेअर करत पंतप्रधान मोदींना केला फोन, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 22:30 IST2026-02-02T22:29:52+5:302026-02-02T22:30:27+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे प्रसिद्ध स्मारक असलेल्या 'इंडिया गेट'चे तोंडभरून कौतुक केले आहे.

'इंडिया गेट'च्या प्रेमात पडले डोनाल्ड ट्रम्प! फोटो शेअर करत पंतप्रधान मोदींना केला फोन, म्हणाले...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे प्रसिद्ध स्मारक असलेल्या 'इंडिया गेट'चे तोंडभरून कौतुक केले आहे. एवढेच नाही, तर ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून विविध विषयांवर चर्चाही केली. ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इंडिया गेटचा फोटो शेअर करत, वॉशिंग्टन डीसीमध्ये जगातील सर्वात मोठे 'विजय द्वार' उभारण्याची आपली महत्त्वाकांक्षी योजना पुन्हा एकदा जगासमोर मांडली आहे.
"इंडिया गेट सुंदर, पण आमचे स्मारक महान असेल!"
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "भारताचे हे 'ट्रायम्फल आर्च' म्हणजेच इंडिया गेट अतिशय सुंदर आहे. पण, आम्ही वॉशिंग्टनमध्ये जे स्मारक उभारणार आहोत, ते जगातील सर्वात मोठे आणि महान असेल." अमेरिकेच्या स्वातंत्र्याला २५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ट्रम्प यांना वॉशिंग्टन डीसीमध्ये एक भव्य विजय द्वार उभारायचे आहे. गेल्या २०० वर्षांपासून अशा स्मारकाची चर्चा सुरू आहे, मात्र आता मी ते प्रत्यक्षात आणणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
Arc de Triomphe in Paris, #France has an overall height of 164 ft, width of 148 ft, and depth of 72 ft. pic.twitter.com/DsPPFVrko1
— Wonders of Europe (@MagicalEurope) December 23, 2016
काय आहे 'आर्क डी ट्रम्प' योजना?
या प्रस्तावित विजय द्वाराला अनौपचारिकपणे 'आर्क डी ट्रम्प' म्हटले जात आहे. ट्रम्प यांनी १ फेब्रुवारी रोजी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जगातील सुमारे ५७ शहरांमध्ये अशी स्मारके आहेत, परंतु वॉशिंग्टन डीसी हे एकमेव मोठे शहर आहे जिथे अद्याप असे विजय द्वार नाही. हे स्मारक पॅरिसमधील जगप्रसिद्ध 'आर्क डी ट्रायम्फ'पासून प्रेरित असेल.
पोटोमॅक नदीच्या काठी उभारणीचे स्वप्न
ट्रम्प यांच्या योजनेनुसार, हे भव्य द्वार पोटोमॅक नदीच्या जवळ उभारले जाईल. अर्लिंग्टन नॅशनल सिमेट्रीकडून मेमोरियल ब्रिज ओलांडून वॉशिंग्टनमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी हे द्वार सज्ज असेल. ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये या स्मारकाचे डिझाइन आणि आर्किटेक्चरल नकाशे देखील अधिकाऱ्यांना दाखवले आहेत.
President Trump just spoke with Prime Minister Modi. STAY TUNED… pic.twitter.com/IFcxrJj04m
— Ambassador Sergio Gor (@USAmbIndia) February 2, 2026
पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा
ट्रम्प यांनी इंडिया गेटचे कौतुक केल्यानंतर काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर संवाद साधला. भारतात नियुक्त अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी या फोन कॉलची पुष्टी केली आहे. या संवादादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीचे संबंध अधिक दृढ होताना दिसत आहेत.