प्रिय व्यक्तीची अंतिम भेटही ‘ऑनलाइन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 04:36 PM2020-03-28T16:36:07+5:302020-03-28T16:38:58+5:30

मृत्यूसमयी आपण आपल्या माणसांसोबत नसणं किंवा आपल्या माणसाचा आपल्या डोळ्यांसमोर मृत्यू होत असताना त्याचा साधा हातही आपल्याला हातात घेता न येणं, आपल्या डोळ्यांसमोर तिला मरताना पाहणं आणि आपल्याला काहीही करता न येणं ही गोष्टच किती भयानक, पण तंत्रज्ञानामुळे त्या व्यक्तीला निदान आपण पाहू तरी शकतो, हेच त्यातल्या त्यात समाधान. कोरोनामुळे मृत्युशय्येवर असलेल्या हजारो रुग्णांना आपल्या अखेरच्या क्षणी केवळ व्हीडीओ लिंकद्वारेच आपल्या प्रियजनांना भेटता येणार आहे.

Corona virus changed lives, so did the death experience!- Now last meet of life is also online!.. | प्रिय व्यक्तीची अंतिम भेटही ‘ऑनलाइन’!

प्रिय व्यक्तीची अंतिम भेटही ‘ऑनलाइन’!

Next
ठळक मुद्देकोरोनानं बदलला जगण्याचा, तसा मृत्यूचाही अनुभव!

लोकमत-

असं काही होईल, आपल्या जिवाभावाची माणसं अगदी आपल्यासमोर आपल्याला सोडून जातील आणि त्यांच्या जवळ असूनही अंतिम क्षणी त्यांची साधी भेटही आपल्याला घेता येणार नाही. असा विचार तरी आपण कधी केला होता का?. पण असं घडतंय खरं! कोरोनानं आपल्या प्रत्येक गोष्टीवर सीमारेषा आखून दिली. अगदी जगण्यापासून ते मृत्यूपर्यंत. जगण्याचा आणि मृत्यूचाही अनुभव कोरोनानं बदलून टाकला. त्याचाच विदारक अनुभव आता जग घेतंय.
त्यातल्या त्यात दिलासा एवढाच कि निदान आज टेक्नॉलॉजी तरी आपल्या हाताशी आहे. याच तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक जण आपल्या आप्तस्वकियांना अखेरचा गुडबाय करीत आहेत.
निदान मृत्यूसमयी तरी आपली माणसं आपल्या जवळ, आपल्या समोर असावी, ही मानवी इच्छा त्यानिमित्तानं का होईना पूर्ण होते आहे.
साऊथ-इस्ट लंडनच्या एका हॉस्पिटलमधील ही घटना. कोरोनाबाधित रुग्ण अखेरच्या घटका मोजत असताना आणि तो आता हे जग सोडून जाणार हे नक्की झाल्यावर त्याचं व्हेंटिलेटर काढण्यात आलं. अर्थातच कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून त्याची प}ी आणि दोघा मुलांनाही त्याच्या जवळ जाण्याची, त्याला अखेरचं पाहण्याची, त्याला शेवटचा गुडबाय म्हणण्याची परवानगी नव्हती. शेवटी रुग्णालय प्रशासनानंच यावर तोडगा काढला. रुग्णाच्या जवळ राहण्याची परवानगी तर रुग्णालयानं दिली, पण व्हिडीओ लिंकद्वारे! रुग्णाच्या अखेरच्या क्षणी त्यांना आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर राहता येईल, पण व्हीडीओच्या माध्यमातून! आपल्या प्रिय व्यक्तीला आपल्या डोळ्यांसमोर मरताना पाहणं ही जगातली सर्वांत अवघड गोष्ट; पण निदान त्यावेळी तरी आपण सोबत होतो, ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी एकमेव गोष्ट. तंत्रज्ञानानं ही संधी त्यांना दिली. 
यासंदर्भात रग्णालयाची मेट्रन डोळ्यांत पाणी आणून सांगते, मृत्यूसमयी आपण आपल्या माणसांसोबत नसणं किंवा आपल्या माणसाचा आपल्या डोळ्यांसमोर मृत्यू होत असताना त्याचा साधा हातही आपल्याला हातात घेता न येणं, आपल्या डोळ्यांसमोर तिला मरताना पाहणं आणि आपल्याला काहीही करता न येणं ही गोष्टच किती भयानक, पण तंत्रज्ञानामुळे त्या व्यक्तीला निदान आपण पाहू तरी शकतो, हेच त्यातल्या त्यात समाधान. अर्थात तीही सोपी गोष्ट नाहीच. निदान अखेरच्या क्षणी तरी कुटुंबाची भेट कशी घडवून आणता येईल, हीच एक रुखरुख आमच्याही मनाला लागली होती. आम्ही त्यासाठी सर्वतोपरी प्रय} केले, पण याचंही दु:ख आहे, यापुढे असे अनेक प्रसंग आम्हाला पाहावे लागणार आहेत. 
रुग्णालयाच्या स्पेशालिस्ट डॉ. राचेल क्लार्क सांगतात, मानवी आयुष्यात आपल्या प्रेमाच्या माणसाच्या स्पर्शाचं, त्याच्या सोबतीचं मोल शब्दांपलीकडे आहे, आयुष्याच्या अखेरच्या क्षणी तर त्याची किंमतच आपण करू शकत नाही, आज त्यालाही आपण पारखे झालो आहोत, पण आता सगळ्याच गोष्टींची तयारी आपण ठेवली पाहिजे. प्रत्यक्ष का होइना, भेटीची ही संधी तंत्रज्ञानानं आपल्याला देऊ केलीय, तेही या घडीला काही कमी नाही. जगात बर्‍याच ठिकाणी आता याच मार्गाचा उपयोग केला जातोय आणि त्यावर टीकाही होतेय. कारण बरेच डॉक्टर ‘तुमचा पेशंट आता मरणार.’, असं नातेवाइकांना प्रत्यक्ष भेटून न सांगता व्हिडीओ लिंकद्वारेच तो संदेश देताहेत.

Web Title: Corona virus changed lives, so did the death experience!- Now last meet of life is also online!..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.