इस्लामाबाद स्फोट: आत्मघाती हल्ल्यात ६९ ठार; जवळच सुरु होते प्रक्षोभक भाषण, ४० मिनिटे रुग्णवाहिकाच नव्हती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 09:23 IST2026-02-07T09:08:47+5:302026-02-07T09:23:18+5:30
पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये झालेल्या भीषण स्फोटात ६९ जणांचा मृत्यू झाला.

इस्लामाबाद स्फोट: आत्मघाती हल्ल्यात ६९ ठार; जवळच सुरु होते प्रक्षोभक भाषण, ४० मिनिटे रुग्णवाहिकाच नव्हती
Islamabad Blast:पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या बाह्य भागात असलेल्या तरलाई येथील 'इमामबारगाह कसर-ए-खदीजातुल कुबरा'मध्ये शुक्रवारी नमाजाच्या वेळी भीषण आत्मघाती हल्ला झाला. या भीषण घटनेत आतापर्यंत ६९ जणांचा मृत्यू झाला असून १६९ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शुक्रवारी दुपारी जेव्हा नमाज सुरु होताच अचानक गोळीबाराचा आवाज आला. काही सेकंदांनंतरच एका प्रचंड स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला. एका २२ वर्षीय तरुणाने आत्मघाती हल्लेखोराला मुख्य हॉलमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोराने स्वतःला गेटवरच उडवून दिले, ज्यात औन अब्बासचाही मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, स्फोटानंतर सुमारे ४० मिनिटांपर्यंत कोणतीही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नव्हती. स्थानिक नागरिकांनीच आपल्या खासगी गाड्यांमधून जखमींना रुग्णालयात नेले.
आयजीपींच्या चुलत भावाचा मृत्यू
या हल्ल्यात इस्लामाबादचे पोलीस महानिरीक्षक सैयद अली नासिर रिझवी यांच्या ३३ वर्षीय चुलत भावाचा, सैयद हसन अली याचा मृत्यू झाला आहे. हसन अली आपल्या जखमी वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना दहशतवाद्यांच्या गोळीबाराला बळी पडला. त्याचे वडील निवृत्त स्क्वाड्रन लीडर सय्यद महमूद अली हे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
तपास यंत्रणांनी घटनास्थळावरून हल्लेखोराचे शीर ताब्यात घेतले असून त्याची ओळख पटली आहे. तो पेशावरचा रहिवासी असून त्याचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आयएसआयएसशी संबंध असल्याचे धागेदोरे मिळाले आहेत. तो अनेकदा अफगाणिस्तानला जाऊन आल्याचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण पाकिस्तानात संताप व्यक्त होत असून सुरक्षा यंत्रणांच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
ही घटना घडली त्यावेळी एक किलोमीटर अंतरावर जामिया मस्जिद कमर उल इस्लाम येथे शिया विरोधी दहशतवादी संघटना सिपाह-ए-सहाबाचा शिया समुदायाविरुद्ध एक कार्यक्रम सुरु होता. प्रमुख पाहुणे म्हणून सिपाह-ए-सहाबाचे प्रमुख मुफ्ती औरंगजेब फारुकी होते. ११ मिनिटांच्या भाषणादरम्यान, सिपाह-ए-सहाबाचे प्रमुख मुफ्ती औरंगजेब फारुकी यांनी वारंवार शिया समुदायाला लक्ष्य केले आणि लोकांना त्यांच्याविरुद्ध भडकावले. प्रत्येक शिया विरोधी भाषणानंतर उपस्थित लोक जयघोष करत होते.
तीन महिन्यांपूर्वीही आत्मघातकी हल्ला
११ नोव्हेंबर २०२५ रोजी इस्लामाबादच्या जी-११ परिसरातील जिल्हा आणि सत्र न्यायालयाबाहेर एक आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला. त्या बॉम्बस्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला आणि ३० हून अधिक जण जखमी झाले.