बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 11:54 IST2025-12-24T11:52:07+5:302025-12-24T11:54:00+5:30
Bangladesh Violence: प्रसिद्ध बांग्लादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी यासंदर्भात एक धक्कादायक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
Bangladesh Violence: बांग्लादेशात अल्पसंख्याक हिंदू समुदायावरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. प्रसिद्ध बांग्लादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी यासंदर्भात एक धक्कादायक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये चिटगाव परिसरात इस्लामिक कट्टरपंथीयांनी अनेक हिंदू कुटुंबांची घरे जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी चिटगावमध्ये घडली. या हल्ल्यात जयंती संघ आणि बाबू शुकुशील या हिंदू नागरिकांच्या घरांना आग लावण्यात आली. आगीत संपूर्ण घरगुती साहित्य जळून खाक झाले असून, पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. घटनेच्या वेळी संबंधित कुटुंबे घरातच होती. आग लागल्यानंतर सर्व दरवाजे बंद झाल्याने जीव वाचवण्यासाठी कुटुंबीयांना कुंपण कापून घराबाहेर पळावे लागले.
प्रशासनाकडून मदतीचे आश्वासन
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केले असून, आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. उपजिला कार्यकारी अधिकारी (UNO) एस. एम. रहातुल इस्लाम आणि सहाय्यक आयुक्त (भूमी) ओंगचिंग मारमा यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानाचा आढावा घेतला. पीडित कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.
लक्ष्मीपूरमध्ये 7 वर्षांच्या मुलीचा आगीत मृत्यू
दरम्यान, 19 डिसेंबरच्या रात्री लक्ष्मीपूर सदर परिसरात एका घराला बाहेरून कुलूप लावून पेट्रोल ओतून आग लावण्यात आली होती. या भीषण घटनेत 7 वर्षांच्या चिमुकलीचा जिवंत जळून मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर भाजले गेले. ही घटना रात्री सुमारे 1 वाजता घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हिंदू युवकाची हत्या; ईशनिंदेचा खोटा आरोप?
18 डिसेंबर रोजी ढाक्याजवळील भालुका भागात दीपू चंद्र या हिंदू युवकाची जमावाकडून बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली होती. त्यांच्यावर ईशनिंदेचा आरोप करण्यात आला होता. मात्र, पोलिस तपासात दीपू यांनी फेसबुकवर कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे किंवा वक्तव्य केल्याचे पुरावे आढळले नाहीत. दीपू हे कपड्यांच्या कारखान्यात काम करत होते आणि ही हत्या कामाच्या ठिकाणी झालेल्या वादातून घडल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.