मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 22:00 IST2025-06-06T21:59:10+5:302025-06-06T22:00:38+5:30
खालिदा जिया यांच्या बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी डिसेंबर २०२५ साली निवडणूक घेण्यावर जोर दिला होता तर नवीन सिटिजन पार्टीने सुधारणा पूर्ण झाल्यानंतर निवडणूक घेण्याची मागणी केली होती.

मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक?
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस यांनी निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. देशात पुढील राष्ट्रीय निवडणूक एप्रिल २०२६ च्या पहिल्या पंधरवड्यात घेतली जाईल असं त्यांनी शुक्रवारी जनतेला संबोधित करताना सांगितले. ईद उल अजहाच्या पूर्वसंध्येला त्यांनी राष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. त्यात निवडणूक आयोग लवकरच सविस्तर आराखडा सादर करेल. सुधार, न्याय आणि निवडणूक हे अंतरिम सरकारच्या प्रमुख उद्देशांसह आपण हे पद सांभाळल्याचं युनूस यांनी जनतेला सांगितले.
मोहम्मद युनूस म्हणाले की, सरकारने सर्व राजकीय पक्षांशी चर्चा केली. देशातील पुढील निवडणूक इतिहासातील सर्वात निष्पक्ष, स्वतंत्र आणि स्पर्धात्मक, स्वीकारार्ह असेल. शहीदांच्या आत्म्यांना शांतता मिळेल. राष्ट्राप्रती प्रामाणिकपणा निष्पक्ष भावनेची त्यांनी आठवण करून दिली. युनूस यांच्या निवडणुकीच्या घोषणेनंतर गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांना पूर्णविराम मिळाला आहे. युनूस यांनी याआधी देशात सुधारणा करण्याचा हवाला देत डिसेंबर २०२५ आणि जून २०२६ या कालावधीत कधीही निवडणूक होऊ शकते असं म्हटलं होते.
खालिदा जिया यांच्या बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी डिसेंबर २०२५ साली निवडणूक घेण्यावर जोर दिला होता तर नवीन सिटिजन पार्टीने सुधारणा पूर्ण झाल्यानंतर निवडणूक घेण्याची मागणी केली होती. पुढील महिन्यात न्यायिक आणि सुधारणा आराखडा याला अंतिम रुप मिळेल. ज्याला व्यापक राजकीय पाठिंबा मिळू शकेल यामुळे बांगलादेशात रिफॉर्म कमिशन स्थापन झाले आहे. एका स्थायी सरकार आणि बांगलादेशात राजकीय स्थिरता देण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होईल असंही युनूस यांनी स्पष्ट केले.
Today @ChiefAdviserGoB announced that the next election in Bangladesh will be held in the first half of April 2026. pic.twitter.com/YloGK0Xu2h
— Sami (@ZulkarnainSaer) June 6, 2025
दरम्यान, २०२४ साली बांगलादेशात राजकीय उलथापालथ झाली होती. यावेळी देशात शेख हसीना यांच्या नेतृत्वातील आवामी लीग सरकारविरोधात कोटा सिस्टमवर नाराजी व्यक्त करत देशभरात आंदोलन सुरू होते. या आंदोलनाच्या हिंसक वातावरणामुळे ५ ऑगस्ट २०२४ साली पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पळण्यास मजबूर केले. सध्या शेख हसीना भारतात राहत असल्याचे बोलले जाते. हसीना सरकार पाडल्यानंतर बांगलादेशात नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. भारतानेही बांगलादेशात स्वतंत्र, निष्पक्ष आणि सर्वसमावेश निवडणूक प्रक्रिया लवकर घेण्याचे आवाहन केले होते. त्याशिवाय शेख हसीना यांच्या आवामी लीगवर बंदी आणल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.