बिल गेट्स म्हणतात, पैसा हे सर्वस्व नव्हे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 08:02 AM2022-07-16T08:02:35+5:302022-07-16T08:04:14+5:30

बिल् गेट्स इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे सार्वजनिक कामासाठी का वापरतात? याचं उत्तर त्यांच्या बाजूने अगदी स्पष्ट आहे.

article on microsoft Bill Gates says money is not everything not interested in Forbes list | बिल गेट्स म्हणतात, पैसा हे सर्वस्व नव्हे!

बिल गेट्स म्हणतात, पैसा हे सर्वस्व नव्हे!

googlenewsNext

बिल गेट्सना एका ऑनलाईन चर्चेत एका व्यक्तीने एकदा विचारलं, “आता तुम्ही एक सामान्य मध्यमवर्गीय व्यक्ती न राहता अब्जाधीश झालेले आहात. त्यामुळे तुम्ही जास्त आनंदी झालायत असं तुम्हाला वाटतं का?”  त्यावर बिल गेट्स म्हणाले, “होय. कारण मला शिक्षण आणि आजारपण या दोन बाबींसाठी खर्च करावा लागला तर? याची आता काळजी वाटत नाही. आर्थिक चणचणीची चिंता करायला न लागणं हे फारच मोठं वरदान आहे. 

मात्र, तरीही ते सुख आणि समाधान मिळवण्यासाठी तुम्हाला अब्जाधीश किंवा कोट्यधीश असण्याची गरज नसते. माझ्या दृष्टीने एका मर्यादेपलीकडे पैशांना फार महत्त्व नाही. उलट आपल्याला शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रातील वाढणारे खर्च कमी करण्याच्या दिशेने काम करण्याची गरज आहे. कारण शिक्षण आणि आरोग्य या दोन सुविधा अशा आहेत की, त्या प्रत्येक व्यक्तीला मिळाल्या पाहिजेत.” 

- जगण्यासाठी पैसे लागतातच. पण, पैसे हे काही सर्वस्व नाही. पैशाने सुख विकत घेता येत नाही. असं ग्यान देणारे आणि त्याचवेळी स्वतःच्या खिशातला एक रुपयाही खर्च ना करणारे अनेक कोट्यधीश आपण अनेक वेळेला बघतो. पण, त्या सगळ्यांमध्ये बिल गेट्स नाहीत. 

ते  म्हणतात, की “पैसे ही गोष्ट संस्था आणि यंत्रणा उभारण्यासाठी आणि चालवण्यासाठी वापरली गेली पाहिजे.” 
बिल आणि मेलिंडा  गेट्स फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्थांना आजवर कोट्यवधी डॉलर्सची मदत केली गेलेली आहे. बिल  गेट्स यांनी नुकतेच २० बिलियन डॉलर्स (म्हणजे जवळजवळ  एक खर्व ६० अब्ज रुपये) त्यांच्या वैयक्तिक संपत्तीतून गेट्स फाऊंडेशनकडे वर्ग केलेले आहेत. त्यांच्या व्यक्तिगत संपत्तीतला हा भलामोठा हिस्सा आता  समाजोपयोगी कामासाठी वापरला जाणार आहे. 

एखादी व्यक्ती, कितीही श्रीमंत असेल तरीही जेव्हा इतके प्रचंड पैसे दान करून टाकते तेव्हा त्या व्यक्तीचा पैशांकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीतरी विशेष असणार, यात काही शंका नाही आणि तो तसा आहेही. पहिली गोष्ट म्हणजे बिल गेट्स  असं म्हणत नाहीत, “की पैसा महत्त्वाचा नसतो.” ते अतिशय स्पष्टपणे हे मान्य करतात की, आयुष्यात पैसे महत्त्वाचे असतात. पण, ते किती महत्त्वाचे असतात याची मर्यादा ठरलेली असते. 

शिवाय ते अत्यंत स्पष्टपणे असं सांगतात की “आयुष्यात समाधान मिळणं हे काही फक्त बँक बॅलेन्सवर अवलंबून नसतं.  तुमची मुलं जेव्हा चांगल्या मार्गाला लागतात तेव्हा तुम्हाला फार समाधान मिळतं. आणि हे शंभर टक्के खरं आहे.” बिल गेट्स यांचं हे म्हणणं आपल्यालाही आपल्या रोजच्या आयुष्यात बघायला मिळतं. आपल्या आजूबाजूला आपल्याला अशी अनेक माणसं बघायला मिळतात, जी आर्थिकदृष्ट्या फार श्रीमंत नसतीलही, पण तरीही ती अत्यंत समाधानी असतात. त्यामागचं कारण असतं त्यांची मुलं. त्यांची मुलं त्यांच्या दृष्टीने जेव्हा चांगल्या मार्गाला लागतात, चांगले नागरिक बनतात, चांगलं आयुष्य जगत असतात, त्यावेळी ही माणसं आनंदात असतात.

बिल गेट्स त्याहीपुढे जाऊन म्हणतात, “समाधानी किंवा आनंदी असण्याचा संबंध दरवेळी पैशांशी जोडलेला असतोच, असं नाही. अनेक वेळा तुम्ही स्वतःला दिलेलं वचन पाळता तेव्हा मिळणारा आनंद आणि समाधान हेही फार वेगळ्या प्रतीचं असतं. उदाहरणार्थ, तुम्ही असं ठरवता की, आपण इथून पुढे जास्त नियमितपणे व्यायाम करायचा आणि ते ज्यावेळी तुम्ही खरोखर करता त्यावेळी तुम्हाला वाटणारा आनंद आणि मिळणारं समाधान हे फार मोठं असतं आणि ते पैशांवर अवलंबून नसतं.” 

पैसे या गोष्टीबद्दल इतका स्वच्छ विचार करणारे बिल आणि त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी कमावलेल्या पैशांच्या बळावर जगाचा प्राण कंठाशी आणणारे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. गेट्स फाऊंडेशन हे जागतिक आरोग्य संघटनेचे दोन क्रमांकाचे दाते आहेत. त्यांनी दिलेल्या देणगीची रक्कम ही अमेरिकन सरकारने दिलेल्या रकमेच्या खालोखाल आहे. 

यापुढे अतिश्रीमंतांच्या यादीत नाही! बिल् गेट्स इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे सार्वजनिक कामासाठी का वापरतात? याचं उत्तर त्यांच्या बाजूने अगदी स्पष्ट आहे. ते म्हणतात, “मला फोर्ब्जच्या अतिश्रीमंतांच्या यादीत असण्यात आता काहीही रस उरलेला नाही.”

Web Title: article on microsoft Bill Gates says money is not everything not interested in Forbes list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.