कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 11:20 IST2025-12-26T11:19:15+5:302025-12-26T11:20:41+5:30
Indian Student Shot Dead in Canada: ३० वर्षीय हिमांशी खुराणा हिची हत्येच्या घटनेला आठ दिवस होत नाही, तोच आणखी एका भारतीयाची कॅनडामध्ये हत्या करण्यात आली आहे.

कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
कॅनडामध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. टोरंटो विद्यापीठात ही घटना घडली आहे. २० वर्षीय शिवांक अवस्थी असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. टोरंटो विद्यापीठातील स्कारबोरो परिसरात असताना शिवांकवर गोळ्या झाडण्यात आल्या.
शिवांक अवस्थी टोरंटो विद्यापीठामध्ये संशोधक विद्यार्थी होता. पीएचडीचे शिक्षण घेत असलेल्या शिवांकवर २३ डिसेंबर रोजी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. शिवांक जखमी अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी सांगितले की, टोरंटोमध्ये झालेली ही ४१वी हत्या आहे.
पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी (२३ डिसेंबर) ३.३४ वाजता हायलँड क्रीक ट्रेल आणि ओल्ड किंग्स्टन रोड परिसरातून कॉल आला. पोलिसांना सांगण्यात आले की, एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेला आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले. तिथे तरुण जखमी अवस्थेत होता. त्याची तपासणी केली असता, त्याचा मृत्यू झालेला होता. पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी हल्लेखोर फरार झाले होते.
भारतीय दूतावासाने काय म्हटले आहे?
कॅनडातील भारतीय दूतावासाने शिवांक अवस्थीच्या मृत्युबद्दल दुख व्यक्त केले आहे. शिवांकच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व प्रकारची मदत केली जाईल, असेही उच्चायुक्तालयाने म्हटले आहे.
"टोरंटो विद्यापीठातील स्कारबोर परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेत पीएचडी करत असलेल्या शिवांक अवस्थीचा मृत्यू झाला असून, या घटनेबद्दल आम्हाला दुःख होत आहे", असे दूतावासाने म्हटले आहे.
आठवडाभरापूर्वी हिमांशीची हत्या
कॅनडातील टोरंटोमध्येच ३० वर्षीय हिमांशी खुराणा या भारतीय तरुणीची गेल्या आठवड्यातच हत्या करण्यात आली होती. स्ट्रेचन एवेन्यू आणि वेलिंग्टन स्ट्रीट डब्ल्यू पोलिसांत ती बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती.
तिचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. या प्रकरणात ३२ वर्षीय अब्दुल गफूरी यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून अटक वॉरंट काढण्यात आले आहे. तो मयत हिमांशी सोबत रिलेशनशिपमध्ये होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.