अल-कायदाचा कमांडर; पाकिस्तानमध्ये लपलाय हाफिज सईदपेक्षा मोठा दहशतवादी, अमेरिकेच्या टार्गेटवर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 16:00 IST2025-11-26T16:00:23+5:302025-11-26T16:00:48+5:30
अमेरिकेने पाकिस्तानमध्ये लपलेल्या दहशतवादी संघटना अल-कायदा एका अत्यंत धोकादायक दहशतवाद्याला टार्गेट केले आहे. हाफिज सईदसारखे स्थानिक दहशतवादी सोडा, पण ...

अल-कायदाचा कमांडर; पाकिस्तानमध्ये लपलाय हाफिज सईदपेक्षा मोठा दहशतवादी, अमेरिकेच्या टार्गेटवर!
अमेरिकेने पाकिस्तानमध्ये लपलेल्या दहशतवादी संघटना अल-कायदा एका अत्यंत धोकादायक दहशतवाद्याला टार्गेट केले आहे. हाफिज सईदसारखे स्थानिक दहशतवादी सोडा, पण या नवीन दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्यास अल-कायदाचे आशियातील अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात येईल, असा अमेरिकेचा अंदाज आहे. या दहशतवाद्याचे नाव आहे ओसामा महमूद ज्याच्यावर अमेरिकेने तब्बल १० मिलियन डॉलर्स इतके मोठे इनाम ठेवले आहे.
ओसामा महमूद हा 'अल-कायदा'चा आशिया प्रमुख असून, अमेरिकेच्या दृष्टीने तो सर्वात मोठा धोका बनला आहे. २०१४ मध्ये त्याला अल-कायदा भारतीय उपखंडाचा प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पाकिस्तानच्या कबायली भागात लपून बसलेला हा दहशतवादी अफगाणिस्तान, पाकिस्तान, म्यानमार आणि बांगलादेशसारख्या देशांमध्ये दहशतवादी कारवायांचे षड्यंत्र रचत असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. ओसामा महमूद हा अल-कायदाचा शेवटचा मोठा कमांडर मानला जातो, जो पकडला गेल्यास अल-कायदाचा आशियाई प्रभाव पूर्णपणे संपुष्टात येईल.
कोण आहे ओसामा महमूद?
ओसामा महमूदचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला. संघटनेत त्याला उसामा महमूद, अबू जार, अत्ता उल्लाह, जार वली अशा अनेक नावांनी ओळखले जाते. २०१५ पूर्वी त्याच्याबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. अल-कायदामध्ये त्याला 'कबायली लढाऊ' म्हणून ओळखले जाते. २०१५ मध्ये अल-जवाहिरीने ओसामा महमूदला भारत-उपखंडाचा म्होरक्या म्हणून नियुक्त केले. २०२२ मध्ये अमेरिकेने त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले, तेव्हापासून तो अमेरिकेच्या प्रमुख लक्ष्यावर आहे. त्याने 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान शेवटचे सार्वजनिक विधान जारी केले होते.
संपर्क आणि समन्वयाची साखळी
अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांच्या मते, ओसामा महमूद अफगाणिस्तान, बांगलादेश, बर्मा, भारत आणि पाकिस्तानमधील जिहादी समूहांमध्ये संवाद वाहिनी म्हणून काम करतो. तो या सर्व दहशतवादी गटांमध्ये समन्वय साधतो. त्याचे मुख्य उद्दिष्ट स्थानिक गटांचा विश्वास संपादन करून 'अल-कायदा'ला पुन्हा मजबूत करणे हे आहे.
अल-कायदा अंतिम टप्प्यात!
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या माहितीनुसार, सध्या अल-कायदाकडे सुमारे २०,००० दहशतवादी उरले आहेत. यातील सर्वाधिक प्रभाव सीरिया आणि सोमालियामध्ये आहे. दक्षिण आशियात अल-कायदाकडे अवघे ५०० दहशतवादी असल्याची माहिती आहे. विशेषतः पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये आता केवळ १००च लढाऊ उरले आहेत. तरीही, ओसामा महमूदच्या नव्या कारवाया आणि रणनीतीने अमेरिकेला सतर्क केले आहे. म्हणूनच, त्याच्यावर १० मिलियन डॉलरचे मोठे इनाम ठेवून अमेरिकेने थेट पाकिस्तानमधून त्याला पकडण्यासाठी मोहीम तीव्र केली आहे.