एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 07:42 IST2026-01-02T07:38:52+5:302026-01-02T07:42:43+5:30
ख्रिसमसचं सेलिब्रेशन नडलं? एअर इंडियाच्या वैमानिकाला कॅनडात पोलिसांनी घेतलं ताब्यात; वाचा नेमकं काय घडलं...

एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
विमान उड्डाणासाठी सज्ज होते, प्रवासी आपल्या जागेवर बसले होते आणि थोड्याच वेळात विमानाचे चाक धावपट्टीवरून आकाशात झेपावणार होते. मात्र, त्याच वेळी एक अशी घटना घडली, जिने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. एअर इंडियाच्या एका वैमानिकाने उड्डाणापूर्वीच मद्यप्राशन केल्याचे उघड झाले असून, कॅनडातील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे दिल्लीकडे निघणाऱ्या विमानाला दोन तास उशीर झाला, मात्र सुदैवाने प्रवाशांचा जीव धोक्यात येण्यापूर्वीच हे प्रकरण उघडकीस आले.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २३ डिसेंबर २०२५ रोजी व्हँकुव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. फ्लाइट नंबर AI186 ही व्हँकुव्हरहून दिल्लीकडे रवाना होणार होती. उड्डाणापूर्वी वैमानिक विमानतळावरील 'ड्यूटी-फ्री' स्टोअरमध्ये गेला होता. तिथे सुरू असलेल्या ख्रिसमस ऑफर्स दरम्यान किंवा दारू खरेदी करताना तिथल्या एका कर्मचाऱ्याला वैमानिकाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. कर्मचाऱ्याला त्याच्या तोंडाचा वास आल्याने त्याने तात्काळ कॅनेडियन अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.
ब्रॅथ अॅनालायझर टेस्टमध्ये 'फेल'
माहिती मिळताच सुरक्षा अधिकाऱ्यांनी वैमानिकाची गाठ घेतली आणि त्याची 'ब्रॅथ अॅनालायझर' चाचणी केली. या चाचणीत वैमानिकाने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले. नियमानुसार, विमान उडवण्यापूर्वी वैमानिकाने कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ किंवा दारूचे सेवन करणे हा गंभीर गुन्हा आहे. अधिकाऱ्यांनी तातडीने त्याला 'अनफिट' घोषित करून विमानातून खाली उतरवले आणि पुढील तपासासाठी ताब्यात घेतले.
एअर इंडियाची 'झिरो टॉलरन्स' भूमिका
या सर्व प्रकारानंतर एअर इंडियाने अधिकृत पत्रक प्रसिद्ध करून प्रवाशांची माफी मागितली आहे. "आम्ही प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहोत. एअर इंडिया अशा प्रकारच्या बेजबाबदार वागणुकीबद्दल 'झिरो टॉलरन्स' धोरण राबवते. संबंधित वैमानिकाला तातडीने कर्तव्यावरून हटवण्यात आले असून, चौकशीनंतर त्याच्यावर कठोर शिस्तभंगविषयक कारवाई केली जाईल," असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
योगायोग की निष्काळजीपणा?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्रिसमसच्या काळात विमानतळावर विविध ब्रँड्सच्या दारूचे सॅम्पल्स चाखण्यासाठी दिले जात होते. वैमानिकाने नकळतपणे ते सॅम्पल घेतले असावे, असा एक प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, केवळ वास होता की त्याने खरंच मद्यप्राशन केले होते, याचा तपास आता कॅनडा पोलीस करत आहेत. हे विमान व्हँकुव्हर-व्हिएन्ना-दिल्ली अशा मार्गावर धावणारे बोईंग ७७७ होते.