इस्रायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांचा युद्धविराम, बैरूतमध्ये हजारो विस्थापित कुटुंबे आनंदात परतू लागली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 07:14 IST2026-04-18T07:14:22+5:302026-04-18T07:14:36+5:30
Israel-Lebanon Ceasefire: इस्रायल आणि हिजबुल्ला या सशस्त्र गटांमधील संघर्षाला पूर्णविराम देणारा १० दिवसांचा युद्धविराम शुक्रवारी लेबनॉनमध्ये लागू झाला. अनेक आठवड्यांच्या विनाशकारी युद्धानंतर इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील शस्त्रसंधी वाढवण्याच्या प्रयत्नांना यामुळे बळ मिळण्याची शक्यता आहे.

इस्रायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांचा युद्धविराम, बैरूतमध्ये हजारो विस्थापित कुटुंबे आनंदात परतू लागली
बैरूत - इस्रायल आणि हिजबुल्ला या सशस्त्र गटांमधील संघर्षाला पूर्णविराम देणारा १० दिवसांचा युद्धविराम शुक्रवारी लेबनॉनमध्ये लागू झाला. अनेक आठवड्यांच्या विनाशकारी युद्धानंतर इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील शस्त्रसंधी वाढवण्याच्या प्रयत्नांना यामुळे बळ मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा करार इस्रायल आणि लेबनॉनमधील युद्धविराम म्हणून घोषित केला. मध्यरात्री युद्धविराम सुरू होताच बैरूतमध्ये रहिवाशांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला.
युद्धामुळे विस्थापित झालेली कुटुंबे दक्षिण लेबनॉन आणि बैरूतच्या उपनगरांकडे परतू लागली आहेत. मात्र, युद्धविराम टिकतो की नाही हे स्पष्ट होईपर्यंत घरी परतण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. युद्धविराम लागू झाल्यानंतर अर्ध्या तासात लेबनॉनच्या खियाम व दिब्बिन गावांवर इस्रायलकडून तोफगोळ्यांचा मारा झाला. तर हिजबुल्लानेही युद्धविराम सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी उत्तर इस्रायलवर रॉकेट डागले होते.
‘आमचे सैन्य हटणार नाही’
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनॉनसोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण या युद्धविरामाला मान्यता दिली आहे, परंतु इस्रायली सैन्य मागे हटणार नाही, असे स्पष्ट केले.
दक्षिण लेबनॉनमध्ये १० किलोमीटर आतपर्यंत इस्रायलने ‘सुरक्षा क्षेत्र’ तयार केले आहे. दुसरीकडे, हिजबुल्लाने आमच्या जमिनीवर इस्रायलचा ताबा राहिल्यास लेबनॉनच्या जनतेला प्रतिकार करण्याचा अधिकार आहे. या भूमिकेमुळे युद्धविरामात अडथळे येऊ शकतात, असे म्हटले आहे.
घरी परतण्यासाठी कित्येक किलोमीटर वाहनांच्या रांगा
शुक्रवार सकाळपासूनच दक्षिण लेबनॉनकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या कित्येक किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. विशेषतः लितानी नदीवरील 'कास्मिए' पुलावर मोठी गर्दी होती, जो टायर शहराला उत्तरेशी जोडणारा मुख्य दुवा आहे.
केवळ एक दिवस आधी इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हा पूल खराब झाला होता, तो घाईघाईने दुरुस्त करून एका बाजूने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. गाड्यांच्या छतावर गाद्या, सुटकेस आणि वाचवलेले सामान लादून लोक संथ गतीने पुढे सरकत होते.
‘होर्मुझमधून जलवाहतूक लवकर बहाल करा’
संयुक्त राष्ट्रे : पश्चिम आशियातील संघर्षादरम्यान व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याच्या कृत्याचा भारताने तीव्र निषेध केला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून विनाअडथळा जलवाहतूक आणि आंतरराष्ट्रीय जागतिक व्यापार लवकरात लवकर पूर्ववत करावा, असे कळकळीचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये केले आहे.
इराणशी संबंधित जहाजांवर लष्करी कारवाई
वॉशिंग्टन : अमेरिकेने आता जगभरात तैनात असलेल्या आपल्या सैन्यदलांना इराणशी संबंधित कोणत्याही जहाजाला रोखण्याची परवानगी दिली आहे. ज्या जहाजांवर शस्त्रे, तेल, धातू किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांसारखी सामग्री नेली जात असल्याचा आणि ती इराणला देत असल्याचा संशय आल्यास, अशा जहाजांवर ही कारवाई केली जाईल, असे अमेरिकेने म्हटले आहे. आमचे सैन्य अशा जहाजांनाही लक्ष्य करेल, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.