जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गाडीला वाळूच्या टिप्परने ठोकरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:29 AM2021-04-10T04:29:08+5:302021-04-10T04:29:08+5:30

हिंगोली : महसूल अधिकाऱ्यांचे वाहन समजून वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले यांच्या शासकीय वाहनाला धडक ...

Zilla Parishad president's car hit by sand tipper | जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गाडीला वाळूच्या टिप्परने ठोकरले

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गाडीला वाळूच्या टिप्परने ठोकरले

Next

हिंगोली : महसूल अधिकाऱ्यांचे वाहन समजून वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले यांच्या शासकीय वाहनाला धडक दिल्याची घटना ९ एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तहसीलसमोर घडली. या अपघातात बेले यांना किरकोळ मार लागला असला, तरीही लोखंडी टाॅमीने मारल्याने हात फ्रॅक्चर झाला आहे. यातून बेले बालंबाल बचावले असले तरीही वाळू माफियांच्या या अतिरेकी भूमिकेबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

हिंगोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले हे ९ एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गावाहून हिंगोलीत दाखल झाले. यावेळी वाहनात पत्नी व मुलगाही सोबत होता. शहरातील रेल्वे उड्डाणपूल परिसरातून जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानाकडे जाण्यासाठी गणाजी बेले यांच्या शासकीय वाहनाची क्रमांक (एमएच ३८ जी १००९) गती कमी झाली. शिवाय रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जायचे असल्याने त्यांनी हात दाखवला. मात्र, याचवेळी वाळूची वाहतूक करणारे टिप्पर शहरातून रेल्वे उड्डाणपुलाकडे जात होते. यावेळी समोरील शासकीय वाहन महसूल अधिकाऱ्यांचे समजून ते टिप्पर पकडण्यासाठीच थांबत असावे, असा समज झाल्याने टिप्पर चालकाने थेट गणाजी बेले यांच्या वाहनाला धडक दिली. या टिप्परचा क्रमांक (एमएच १२ एचडी ३१५६) असा आहे. यामध्ये गणाजी बेले यांचे वाहन काही फूट घासत गेले. तसेच गणाजी बेले यांनाही किरकोळ मार लागला. विशेष म्हणजे हा टिप्पर एका दुकानात घुसण्यासाठी काही फूटच अंतर राहिले होते. दुकान बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात शासकीय वाहनाचेही नुकसान झाले असून, मुका मार लागल्याने बेले यांना शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आपल्याला लोखंडी टॉमीने मारहाण केल्याचा आरोपही अध्यक्ष गणाजी बेले यांनी केला आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षांनी याबाबतची माहिती शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात जावून आधी उपचार घेण्यास सांगण्यात आले. त्याचवेळी आधीच टिप्परच्या चालकासह त्याचे काही नातेवाईक तेथे होते. त्यांनी पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्ष बेले यांच्यावर चालून येत दमदाटी तसेच शिवीगाळही केली. यानंतर अध्यक्षांनी तेथून एका खासगी रुग्णालयात दाखल होत उपचार करून घेतले.

याबाबत बेले म्हणाले, माझ्या वाहनाला तर धडक दिलीच. शिवाय मला व माझ्या वाहनाच्या शासकीय कर्मचारी असलेल्या चालकालाही शुद्ध हरपेपर्यंत मारहाण केली. चालकाकडील चावी काढून घेतली तरीही तो पळून गेला. त्यानंतर उलट आम्हीच मारहाण केल्याची बतावणी करत एका नगरसेवकासह नातेवाईकांना घेऊन शासकीय रुग्णालयात असताना अंगावर धावून आला. आदिवासी असल्याचे माहिती असून, जातीवर तसेच इतर अश्लील शिवीगाळही केली. याबाबतची तक्रार पोलिसात दाखल करणार असल्याचे बेले यांनी सांगितले.

Web Title: Zilla Parishad president's car hit by sand tipper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.