-दिलीप कावरखे
गोरेगाव (जि. हिंगोली): हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून हळदीचे दर जाणीवपूर्वक पाडून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याच्या आरोपावरून आज, २२ एप्रिल रोजी गोरेगाव चौफुलीवर तीव्र आंदोलन करण्यात आले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात संतप्त शेतकऱ्यांनी चक्क रस्त्यावर हळद पेटवून दिली. या प्रकारामुळे राज्य रस्त्यावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.
लुटमारीचा 'NCDEX' पुरावाराष्ट्रीय स्तरावर (NCDEX) हळदीचे दर प्रति क्विंटल १६,५०० रुपयांच्या आसपास असताना स्थानिक व्यापारी मात्र १२,००० ते १३,५०० रुपयांनी खरेदी करत आहेत. प्रति क्विंटल ३ ते ४ हजार रुपयांची ही तफावत म्हणजे शेतकऱ्यांचे उघड शोषण असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. "हळद पिकवण्यासाठी घेतलेल्या कष्टाची जर किंमत मिळणार नसेल, तर ती व्यापाऱ्यांना कवडीमोल दराने देण्यापेक्षा जाळणे आम्ही पसंत करू," असा पवित्रा मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे व जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी घेतला.
प्रशासकीय मध्यस्थी आणि इशाराआंदोलनामुळे गोरेगाव-येलदरी-जिंतूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके आणि बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्यांची समजूत काढली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून दर निश्चिती न केल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला.