- रमेश कदमआखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : प्रेमप्रकरणात ‘नॉट रिचेबल’ झालेल्या मित्राला फोन लावताना ‘त्या’ तरुणाचा राँग नंबर लागला. राँग नंबरवर तो एका महिलेशी बोलत होता. बोलता-बोलता ओळख झाली. प्रेमाच्या गोष्टी करत व्हिडीओ कॉल करून एकमेकांची पसंती झाली. काही काळातच ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले अन् सहा महिन्यांनी दोन लेकरं घेऊन तिने घर सोडलं आणि प्रियकरासोबत त्याच्या घरात नवीन संसार थाटला; परंतु तिच्या कुटुंबीयांनी व सोलापूर पोलिसांनी तिचा शोध लावला. अखेर नव्याने फुललेल्या प्रेमाला बाजूला करत पोलिसांनी तिला पुन्हा जुन्या संसारात परत पाठविले.
ऑनलाइन प्रेमकहाणीचा शेवट बाळापूरच्या पोलिस ठाण्याच्या प्रांगणात झाल्याने राँग नंबरची प्रेमकहाणी भलतीच चर्चेत आली. बाळापूर पोलिस ठाणे हद्दीतील एका गावातील एका तरुणाने (वय २२) काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या त्याच्या मित्राला बोलण्यासाठी फोन लावला. मात्र तो राँग नंबरवर डायल झाला; परंतु सिनेमातील कथानकाप्रमाणे समोरून मंजूळ स्वरातली सुंदरी त्याला बोलू लागली. बोलता-बोलता ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. ते एकमेकांना ऑनलाइन बोलत बोलत अखंड प्रेमात बुडाले. ‘ती’ वयाने मोठी, लग्न झालेली, दोन मुलांची आई. हा अविवाहित. गरीब कुटुंबातला; पण प्रेम आंधळं असते म्हणतात त्याचा हा साक्षात्कार.
सोलापूर जिल्ह्यात तिच्या मुलाच्या वाढदिवसासाठी तरुण त्याच्या आईला घेऊन गावात गेला. दोन दिवस मुक्काम केला आणि या काळात पुन्हा प्रेमाची पालवी बहरली. पुन्हा फोनवर संपर्क सुरूच होता. ६ डिसेंबर २०२४ रोजी तिने दोन लेकरे घेऊन माहेरी जाऊन येते, असे सांगून नवऱ्याला सोडले आणि प्रियकरासोबत पोबारा केला. या तरुणानेही लेकरासहित प्रेयसीला घेऊन आपल्या गावातील घरी आणले.
सोलापूर पोलिस तिच्या नातेवाइकांना घेऊन थेट बाळापूर पोलिस ठाण्यात आले. बाळापूर पोलिसांची मदत घेऊन पोतरा गावात त्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले. प्रेमात आकंठ बुडालेल्या तिने प्रथम त्या तरुणासोबतच आयुष्य काढणार असल्याचे सांगितले; परंतु पदरी असलेली मुले आणि संसाराचा हवाला देत पोलिसांनी तिला वास्तवाची जाण करून दिली.
पोलिसांमुळे शेवट गोड झालाया ऑनलाइन प्रेमाच्या नाटकाची स्टोरी मोडून जुन्या संसाराची घडी बसवताना पोलिसांना मात्र मोठी कसरत करावी लागली. अखेर तिला तिच्या नातेवाइकांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी समजूत काढून ‘खरा संसार’ करण्याचा मार्ग तिला दाखवला.