"माझा हप्ता आला नाही म्हणून पकडता का?"; वाळू माफियाचा डेप्युटी कलेक्टरांना थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 16:51 IST2026-05-16T16:48:46+5:302026-05-16T16:51:35+5:30

"साहेब, १०० गाड्या हप्ता देतात, माझीच गाडी का पकडली?'' पोलिसांसमोर वाळू माफियाचा राडा; व्हिडिओ व्हायरल.

Sengaon Sand Mafia Case: High Voltage Drama in Hingoli as Mafia Exposes Bribe System to Deputy Collector | "माझा हप्ता आला नाही म्हणून पकडता का?"; वाळू माफियाचा डेप्युटी कलेक्टरांना थेट सवाल

"माझा हप्ता आला नाही म्हणून पकडता का?"; वाळू माफियाचा डेप्युटी कलेक्टरांना थेट सवाल

सेनगाव (प्रतिनिधी): तालुक्यात महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या नाकाखाली वाळू माफियांची मुजोरी किती टोकाला पोहोचली आहे, याचा जिवंत प्रत्यय सेनगाव-गोरेगाव मार्गावर मध्यरात्री आला. बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडणाऱ्या हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी (डेप्युटी कलेक्टर) समाधान घुटुकडे आणि पोलीस कर्मचाऱ्यांसोबत वाळू माफियांनी रस्त्यातच तब्बल अर्धा तास जोरदार राडा घातला.

"१०० गाड्यांचा हप्ता जातो..." व्हिडिओ व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, डेप्युटी कलेक्टर समाधान घुटुकडे हे मध्यरात्री आपल्या पथकासह गस्तीवर असताना त्यांनी वाळूची चोरटी वाहतूक करणारे एक डंपर अडवले. ही कारवाई सुरू असतानाच एका बोलेरो जीपमधून मद्यधुंद अवस्थेत आलेल्या दोन वाळू माफियांनी थेट अधिकाऱ्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

''लवकरच हप्ता देतो, पण माझी गाडी सोडा''
नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केलेल्या व्हिडिओत हा माफिया पोलिसांसमोर हात जोडून थेट हप्तेखोरीची कबुली देत आहे. "साहेब, माझ्या गाडीचा तुम्हाला हप्ता मिळाला नाही. या मार्गावर १०० गाड्या चालतात, त्या तुम्हाला हप्ता देतात. माझी चूक झाली, मी तुम्हाला लवकरच हप्ता देतो, पण माझी गाडी सोडा," असे तो कॅमेऱ्यासमोर ओरडून सांगत आहे. यावरून परिसरात सुरू असलेली मोठी हप्तेखोरी चव्हाट्यावर आली आहे.

पोलिसांची मवाळ भूमिका कॅमेऱ्यात कैद
गुंडांवर कडक कारवाई करण्याऐवजी घटनास्थळावरील पोलीस अधिकारी अत्यंत मवाळ भूमिकेत दिसले. पोलीस त्या वाळू माफियाला चक्क ‘दादा’, ‘भाऊ’, ‘अध्यक्ष’ अशी हाक मारत "राडा करू नका" म्हणून विनवण्या करत होते. पोलिसांच्या या भूमिकेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल
अखेर डेप्युटी कलेक्टर समाधान घुटुकडे यांनी या दोन्ही माफियांना गोरेगाव पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्या शासकीय तक्रारीवरून संजय गोरे आणि समाधान राऊत या दोन्ही वाळू माफियांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वाळूने भरलेल्या डंपरसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास गोरेगाव पोलीस करत आहेत.

Web Title : "मेरा हफ्ता नहीं मिला इसलिए पकड़ा?" रेत माफिया का कलेक्टर से सवाल।

Web Summary : सेंगाँव में रेत माफिया ने डिप्टी कलेक्टर से रिश्वत की बात कबूली, वाहन जब्त। पुलिस नरम, जनता नाराज। दो गिरफ्तार।

Web Title : "Why arrest me? My bribe unpaid?" Sand mafia asks Collector.

Web Summary : Sand mafia confronted a Deputy Collector in Sengao, admitting to bribery after their vehicle was seized. Police were lenient, sparking public anger. Two arrested.