हिंगोली, वसमतमध्ये ऑक्सिजन बेड हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:29 AM2021-04-10T04:29:17+5:302021-04-10T04:29:17+5:30

हिंगोली : जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात असल्याने शासकीय यंत्रणाच सर्व देण्यासाठी सक्षम होती. अजूनही सौम्य लक्षणांच्या रुग्णांसाठी मोठी ...

Oxygen Bed Housefull in Hingoli, Wasmat | हिंगोली, वसमतमध्ये ऑक्सिजन बेड हाऊसफुल्ल

हिंगोली, वसमतमध्ये ऑक्सिजन बेड हाऊसफुल्ल

Next

हिंगोली : जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात असल्याने शासकीय यंत्रणाच सर्व देण्यासाठी सक्षम होती. अजूनही सौम्य लक्षणांच्या रुग्णांसाठी मोठी यंत्रणा उपलब्ध असली, तरीही हिंगोली व वसमतमध्ये ऑक्सिजन बेड पूर्णपणे आटल्याने रुग्णांना सेनगाव तालुक्यातील कवठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्याची वेळ येत आहे. हिंगोली जिल्ह्यात आता सक्रिय रुग्ण १,०४६ एवढे झाले आहेत. यापैकी २१५ जण गंभीर असल्याने ऑक्सिजनवर आहेत. याशिवाय कोरोना निष्पन्न न झालेले सारीचेही जवळपास सव्वाशे रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे साडेतीनशेपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड आता वापरात आले आहेत. हिंगोली जिल्हा रुग्णालयात १२० ऑक्सिजन खाटा असून, त्या पूर्ण रुग्णांसाठी वापरल्या. वसमतला ५० खाटा असून, त्याही पूर्ण वापरल्या गेल्या आहेत. कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात १०० खाटा असून, त्यापैकी ७० खाटा कोरोना रुग्णांसाठी तर आणखी काही खाटा इतर रुग्णांसाठी वापरल्या आहेत. दहा ते पंधरा खाटा शिल्लक आहेत. हिंगोलीतील औंढा रोडवरील अल्पसंख्याक वसतिगृहात ९० खाटा असून, त्याही रुग्णांसाठी पूर्णपणे वापरल्या आहेत.

कवठा केेंद्र सुरू; ५० ऑक्सिजन खाटा उपलब्ध

ऑक्सिजनच्या खाटा अपुऱ्या पडत असल्याने आता सेनगाव तालुक्यातील कवठा प्राथमिक आरोग्य केंद्रातील ५० ऑक्सिजन खाटांच्या कोरोना रुग्णालयात आजपासून रुग्ण भरती करण्यास प्रारंभ झाला आहे. याठिकाणी वसमत तालुक्यातील ५ रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात ऑक्सिजन खाटांचा प्रश्न गंभीर बनण्याची भीती आहे. औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. हे केंद्र लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र, त्या तुलनेत मनुष्यबळ उभे करण्यासाठी आरोग्य विभागाला झगडण्याची वेळ येत आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा

हिंगोलीत एवढे दिवस मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा आता तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध करून घेण्यास सांगून ऑक्सिजन बेड देण्याची तयारी दाखवली जात आहे. इंजेक्शन असेल तरच बेड देण्यास प्रशासनाचे आदेश असल्याने रुग्णांची मात्र अडचण होऊन बसली आहे.

Web Title: Oxygen Bed Housefull in Hingoli, Wasmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.