आंबा चौंडी येथील वनविभागाच्या कार्यालय परिसरात तरुणाचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 13:59 IST2018-11-01T13:58:11+5:302018-11-01T13:59:25+5:30
वसमत तालुक्यातील अंबा चोंडी येथील वनविभाग कार्यालयाच्या आवारात आज सकाळी एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला.

आंबा चौंडी येथील वनविभागाच्या कार्यालय परिसरात तरुणाचा मृतदेह आढळला
कुरुंदा (हिंगोली) : वसमत तालुक्यातील अंबा चोंडी येथील वनविभाग कार्यालयाच्या आवारात आज सकाळी एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा घातपात असल्याचा संशय ग्रामस्थांतून व्यक्त होत असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आंबा चोंडी येथील वन विभाग कार्यालयाच्या आवारात पानटपरी जवळ वाई गोरखनाथ येथील नागेश बाबूराव खंदारे (२८) यातरुणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळला. ग्रामस्थांनी कुरुंदा पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी डीवायएसपी भोरे, सपोनि शंकर वाघमोडे, फौजदार वैभव नेटके, सपोउपनि शंकर इंगोले यांनी घटनास्थळी भेट देऊन श्वान पथकाला पाचारण केले. परंतु त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. शवविच्छेदनच्या अहवालानंतरच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागणार आहे.
कुरुंदा पोलिसांनी मयत नागेश खंदारे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वसमत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसात उशिरापर्यंत कोणतीही नोंद झाली नाही. घटनास्थळाजवळच रेल्वेस्थानक व बसस्थानक असल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.