कळमनुरी (हिंगोली) : वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर वाळू तस्करांनी हल्ला केला. यात एक मंडळ अधिकारी जखमी झाला. ही घटना कळमनुरी येथील जि.प.शाळेसमोर १७ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. या प्रकरणी सात जणांविरूद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
कळमनुरी तालुक्यातील नांदापूर शिवारातून एका ट्रॅक्टरमधून वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती कळमनुरीच्या महसूल पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास हिंगोली ते कळमनुरी मार्गावर उमरा फाटा येथे एक ट्रॅक्टर थांबविले. हे ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात आणले जात होते. ट्रॅक्टर कळमनुरी शिवारात आले असतांना एका वाहनातून आलेल्या सात जणांनी ट्रॅक्टर अडवून महसलच्या पथकावर हल्ला केला. यावेळी एका कर्मचाऱ्यांनी काठीचा वार हातावर घेतला असता त्यांच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तस्करांनी वाळू खाली टाकून ट्रॅक्टरसह पळ काढला.
या प्रकरणी मंडळ अधिकारी प्रेमदास चव्हाण यांच्या फिर्यादीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात प्रकाश गणपत गिराम, शुभम प्रकाश गिराम, आसीफ मुक्तार शेख, ओम प्रकाश गिराम (सर्व रा. मसोड, ता. कळमनुरी), दत्ता माहोरे व अन्य दोघे जण अशा सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक शेवाळे तपास करीत आहेत.