मोठा दिलासा! तज्ज्ञांनी शोधलं कोरोना विषाणूंचा प्रसार थांबवण्याचं औषध; 'असा' थांबेल प्रसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 15:57 IST2020-07-08T15:44:30+5:302020-07-08T15:57:37+5:30
CoronaVirus News : कोरोना व्हायरस आपल्या मुख्य प्रोटीन एमप्रो शिवाय विस्तार करू शकत नाही. तसंच कोणत्याही व्यक्तीला संक्रमितही करू शकत नाही.

मोठा दिलासा! तज्ज्ञांनी शोधलं कोरोना विषाणूंचा प्रसार थांबवण्याचं औषध; 'असा' थांबेल प्रसार
कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी आत्तापर्यंत कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध झालेलं नाही. देशभरातील शास्त्रज्ञ कोरोनावर लस किंवा औषधं शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सध्या अमेरिकेतील तज्ज्ञांना कोरोनाच्या लसीबाबत एक मोठं यश मिळाले आहे. अमेरिकतील तज्ज्ञांनी कोरोनाला रोखण्यासाठी व्हायरसच्या प्रसाराला रोखण्याचं औषध तयार केलं आहे. हे संशोधन सेल रिसर्चमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. तज्ज्ञांच्यामते या औषधाने व्हायरस प्रोटीनची वाढ रोखता येऊ शकते.
या औषधांमध्ये हेपेटायटिस सी ची बोसेप्रिविर आणि वेटनरी एंटीव्हायरल जीसी 376 या औषधांचा समावेश आहे. फ्लोरिडा युनिवर्सिटीतील तज्ज्ञांच्यामते या औषधात असलेल्या तत्वांनी मुख्य प्रोटीन एमप्रो (एंजाइम) वर हल्ला करता येऊ शकतो. परिणामी व्हायरसचा प्रसार होण्यापासून थांबवता येऊ शकतं. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस आपल्या मुख्य प्रोटीन एमप्रो शिवाय विस्तार करू शकत नाही. तसंच कोणत्याही व्यक्तीला संक्रमितही करू शकत नाही.
अशा स्थितीत व्हायरसच्या प्रसाराची क्षमता कमी झाल्यास व्यक्ती लवकरात लवकर बरा होण्यास मदत होईल तसंच व्हायरसच्या संक्रमणामुळे वाढणारा मृत्यूदर कमी होईल. या एमप्रो एंजाइमला सुरूवातीच्या काळात सार्स, मर्स व्हायरस एंटीव्हायरल ड्रगसाठी टार्गेट करण्यात आले होते. या दोन्ही व्हायरसशी कोरोना व्हायरस हा अनुवांशिक स्वरुपातून मिळता जुळता आहे. याच एंजाईमवर कोरोना व्हायरस किती वेळ जीवंत राहणार आहे हे ठरणार असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रोटीन्सवर आक्रमण करत असलेल्या या औषधांनी शरीराचं कोणतंही नुकसान होत नाही.
फ्लोरिडा यूनिवर्सिटीतील मुख्य प्रोफेसर यु चेन यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसप्रमाणे इतर व्हायरस वेगाने पसरत असल्यामुळे नवीन एंटी व्हायरल औषध विकसित करण्यासाठी पुरेसा वेळ नाही. त्यामुळे आधीपासून वापरात असलेल्या औषधांवर प्रयोग सुरू आहेत. या अभ्यासानुसार या प्रयोगांमध्ये दिसून आलेल्या सकारात्मक परिणामांतून लवकरच चांगले औषध तयार होऊ शकते, अशी आशा तज्ज्ञांना आहे.
रोजच्या वापरातील 'या' वस्तूंमुळे होऊ शकतं कोरोनाचं संक्रमण; जाणून घ्या बचावाचे उपाय
अभिमानास्पद! 'या' व्यक्तीवर होणार भारतातील कोरोना लसीचे पहिले परिक्षण; जाणून घ्या प्रक्रिया