मुंबई : अलीकडे हर्बल, ग्रीन आणि लेमन टीकडे अधिकाधिक व्यक्तींचा ओढा वाढला आहे. या वेगवेगळ्या चहाच्या प्रकारांचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असे मत आहारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या निमित्ताने आहारतज्ज्ञांनी चहाच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे.वेगवेगळ्या चहांच्या अतिसेवनाने अनेक व्याधी होऊ शकतात. यात तीव्र डोकेदुखी, घाबरल्यासारखे होणे, निद्रानाशाची समस्या, उलटी, डायरिया, चिडचिडेपणा, हृदयाचे ठोके जलदगतीने पडणे, हातापायात कंप, हार्ट बर्न, चक्कर येणे, कानांमध्ये आवाज येणे आदी लक्षणे जाणवतात, असे मत आहारतज्ज्ञ डॉ. सुलक्षणा कौशिक यांनी सांगितले. तर ‘ग्रीन टी’मधील टेनन नामक रसायनामुळे पोटातील अॅसिडची मात्रा वाढते. टेननमुळे बद्धकोष्ठता, पोटदुखी, मळमळ संभवते. म्हणूनच जपान आणि चीनमध्ये जेवण झाल्यानंतर अथवा जेवणाच्या मध्ये ‘ग्रीन टी’ घेतला जातो. पेप्टक अल्सरची समस्या असल्यास ‘ग्रीन टी’ घेणे योग्य नाही. यातील रसायने गर्भावस्थेत घातक ठरू शकतात. या महिलांनी दिवसातून दोन कपापेक्षा अधिक घेऊ नये, असा सल्ला आहारतज्ज्ञ वृषाली शाह यांनी दिला. नियोजनबद्ध आहार किंवा चहा सोडला आहे अशा व्यक्ती हर्बल, ग्रीन वा लेमन टीला पसंती देतात. मात्र, अशा पद्धतींच्या चहाचा अतिरेक हा आरोग्याला घातक ठरू शकतो.लहानग्यांना चहाची आवड लावणेही धोकादायकलहानग्यांना चहाची आवड लावणे ही सवयसुद्धा धोकादायक आहे. चहामुळे लहानग्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे ही सवय मोडून रोज एक ग्लास दूध पिण्याची सवय लावावी, असेही डॉ. कौशिक यांनी सांगितले. बऱ्याचदा चहा, कॉफी यांसारख्या पेयांमध्ये कॅफीनचा अतंर्भाव असतो.कॅफीनमुळे श्वासोच्छ्वास, रक्ताभिसरण, चयापचय व उत्सर्जन याचा वेग वाढतो, म्हणून या पेयाच्या सेवनामुळे तरतरी आल्यासारखे वाटते. सर्वसाधारणपणे हा उत्साह २० मिनिटे ते १ तासापर्यंत राहतो आणि पुन्हा चहा किंवा कॉफी पिण्याची इच्छा निर्माण होते.अतिसेवनाचे दुष्परिणामपोटदुखी, अॅसिडिटी आणि लूज मोशनची समस्या होऊ शकते. रिकाम्या पोटी सेवन आरोग्यास नुकसान करणारे ठरू शकते. जास्त प्रमाणात लेमन, ब्लॅक, ग्रीन टी प्यायल्यास अॅनिमियाची शक्यता वाढते.ग्रीन टी सेवन करत असाल तर डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. ग्रीन टीमध्ये असलेल्या कॅफीनमुळे डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे दिवसातून कमीत कमी दोन कप ग्रीन टी सेवन करावी.जास्त प्रमाणात ग्रीन टी सेवन केल्यास झोप न येण्याची समस्या होऊ शकते. ग्रीन टीच्या अतिसेवनामुळे झोप प्रभावित होते. त्यामुळे आणखीही काही आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जास्त प्रमाणात ग्रीन टीचे सेवन केल्याने हृदयाशी निगडित समस्या वाढण्याची शक्यता असते.ब्लॅक, लेमन, ग्रीन टीचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास डायरिया होण्याचीही शक्यता असते.कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांना एक कप कॉफी किंवा चहा हितावह ठरू शकतो. प्रत्येक व्यक्तीने सरासरी २०० ते ४०० मिलीग्रॅम कॅफीनचे सेवन करणे आरोग्यासाठी हितावह ठरते. कॅफीनमुळे चयापचय वाढते, त्यामुळे वजन कमी करण्याच्या औषधांमध्ये याचा वापर केला जातो.
लेमन, ग्रीन टीचे अतिसेवन धोकादायक; आहारतज्ज्ञांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 01:14 IST