चांगल्या आरोग्यासाठी ऋतुंनुसार कसा आहार घ्यायचा? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 05:32 PM2020-09-25T17:32:45+5:302020-10-07T15:16:29+5:30

आवश्यक त्या पोषक घटकांचा पुरेशा मात्रेमध्ये समावेश असलेला सुयोग्य आहार घेतल्याने तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक पेशींच्या कार्याला बळ मिळते व निरोगी रोगप्रतिकारशक्ती अधिक चांगल्याप्रकारे सक्रिय होते.

How to eat according to the seasons for good health? | चांगल्या आरोग्यासाठी ऋतुंनुसार कसा आहार घ्यायचा? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला 

चांगल्या आरोग्यासाठी ऋतुंनुसार कसा आहार घ्यायचा? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला 

googlenewsNext

डॉ. आरती सोमण, आयुर्वेदिक तज्ज्ञ, निसर्ग हर्ब्स. (Image Credit : newscrab.com)

प्रत्येक ऋतूमध्ये आपल्या भोवतीचे वातावरण बदलते आणि परिसरातील या बाह्य बदलांचा आपल्या शरीराच्या अंतर्गत यंत्रणेवर फार गहिरा परिणाम होऊ शकतो. आपण रोजच, सातत्याने सर्व त-हेच्या हानीकारक सूक्ष्मजीवांच्या संपर्कात येत असतो. अशा सूक्ष्मजीवजंतूंचा आपल्यावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे शरीरात आजार किंवा संसर्ग उद्भवू शकतो. ऋतुंनुसार आपल्या आहाराचे नियोजन करणे व त्यानुसार खाणे यामुळे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदेशीर गोष्टी मिळू शकतात, तुम्ही अधिक उत्साही बनता, तुमची रोगप्रतिकारशक्ती अधिक बळकट होते. अनेक पद्धतींच्या गुंतागुंतींना अटकाव होतो. सुनियोजित आहारामुळे नकोशी वजनवाढ, अपचन, पोटात इन्फेक्शन होणे, श्वसनयंत्रणेच्या समस्या आणि इतर हृदयाशी संबंधित समस्यांना आळा बसतो.

आवश्यक त्या पोषक घटकांचा पुरेशा मात्रेमध्ये समावेश असलेला सुयोग्य आहार घेतल्याने तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक पेशींच्या कार्याला बळ मिळते व निरोगी रोगप्रतिकारशक्ती अधिक चांगल्याप्रकारे सक्रिय होते. काही प्रकारचा आहार हा तुमच्या शरीराला सूक्ष्मजीवजंतूंच्या हल्ल्याचा, अतिरिक्त जळजळ आणि वारंवार होणारी इन्फेक्शन्स यांचा प्रतिकार करायला अधिक चांगल्या त-हेने तयार करतो. म्हणूनच शरीराला बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत करण्यासाठी विशिष्ट ऋतूला साजेशा विशिष्ट आहारपद्धतीचा स्वीकार करायला हवा. आयुर्वेदामध्ये यासाठी ऋतूचर्या हा शब्द वापरला आहे.

आपल्या शरीरातील अंत:स्त्रावांचा समतोल राखण्यासाठी, रोगप्रतिकारशक्तीला बळ देण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी ऋतूनुसार पाळायचा दिनक्रम, जीवनशैली आणि विशिष्ट ऋतूनुसार घ्यायचा आहार असा या साध्याशा शब्दाचा अर्थ आहे. आपण जे खातो ते निसर्गाशी मेळ खाणार नसेल तर त्याचा रोगप्रतिकारशक्तीवर विपरित परिणाम होऊ शकतो व त्यातून जीवनशैलीशी निगडित आजारांचा धोका वाढू शकतो. 

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ऋतुनुसार आहार घेण्याविषयी काही सूचना – 

मान्सून हा असा एक काळ आहे, ज्यात आजार, विशेषत: पचनसंस्थेशी निगडित आजार जोरावर असतात ही फारच दु:खद गोष्ट आहे. त्यामुळे या काळामध्ये आपल्या आहारातील घटकांबरोबरच अन्नाचा दर्जा आणि प्रमाण या गोष्टींवर लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे बनून जाते. 

पावसाळी ऋतू: पावसाळ्यामध्ये शक्यतो गरम केलेले आणि ताजे शिजवलेले अन्न खावे, कारण असे अन्न पचायला सोपे व पोटासाठी हलके असते. या काळात आहारात भरपूर हिरव्या आणि विविध रंगांच्या भाज्यांचा समावेश असायला हवा. अशा भाज्यांत पोषक घटकांची रेलचेल असते, जे या ऋतूमध्ये तुम्हाला तंदुरुस्त ठेवतात. या काळात औषधी प्रक्रिया केलेले किंवा उकळलेले पाणी प्यायला हवे. सुरक्षित, पिण्यास योग्य पाणी भरपूर प्रमाणात पिण्याइतकेच गरम, ताजा बनविलेला काढा, कढणं, सुप्स पिणेही महत्त्वाचे आहे. ओमेगा-3 फॅटी अॅसिड्सही या काळात खूप महत्त्वाची आहेत, कारण ती रोगप्रतिकारशक्तीला बळ देण्याचे कार्य करतात व अँटिऑक्सिडंट्स म्हणूनही काम करतात. मासे, शिंपले, कालवे, नट्स आणि अक्रोड, पिस्ता, चिआ सीड्स, अंबाडीच्या बिया यांसारख्या तेलबियांमधून नैसर्गिक ओमेगा 3 मिळते. त्याचबरोबर डाळींब, प्लम, लिची, पेअर सारखी विविध मोसमी फळे आणि गाजर, मूळा आणि मेथीसारख्या भाज्या खाणेही महत्त्वाचे आहे. रोजच्या आहारामध्ये आले, हळद, काळीमिरी आणि लवंगासारख्या मसाल्यांचाही वापर करायला हवा. मसाले हे जंतूनाशक, जळजळ कमी करणारे असतात, त्यांच्यामुळे आपल्या चयापचय यंत्रणेत सुधारणा होते व रोगप्रतिकारशक्तीला बळ मिळते. 

हिवाळी ऋतू : या ऋतूमध्ये आपले शरीर उबदार ठेवणे व त्याला पुरेसे पोषण देणे हे लक्ष्य ठेवायला हवे. गोड, आंबड आणि खारट पदार्थ तसेच बिनधास्तपणे तळलेले पदार्थ खाण्याचे हेच दिवस असतात. आपला जठराग्नी पेटता ठेवण्यासाठी गरम आणि मसालेदार पदार्थ खावेत. तोंडाला पाणी आणणा-या, फूग आलेल्या पदार्थांपासून बनविलेल्या पाककृतीही आवर्जून खाव्यात आणि थंड, हलके व कोरडे पदार्थ खाणे टाळावे. या ऋतूमधील आदर्श आहारात भोपळा, कोबी, पालक, मका, भात, गाजर, बटाटे, कांदे, बीट, सफरचंद, खजूर आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश होतो. उकडलेले पदार्थ हा थंडीच्या दिवसांतील आहाराचा सर्वोत्तम पर्याय आहे. गाजर, बीट, हिरव्या पालेभाज्या तसेच कंदभाज्या या अत्यंत फायदेशीर ठरतात व त्या वाफवून किंवा इतर प्रकारे शिजवून खाता येतात. अंजीर आणि खारीक हा सुकामेवा थंडीत शरीराची उब राखून ठेवण्यासाठी उत्तम प्रकारे मदत करू शकतात. अंजीर आणि खारीक हे दोन्ही पदार्थ कॅल्शियम आणि लोहाने समृद्ध आहेत व त्यांची प्रकृती उष्ण आहे. ते शरीरातील ऊर्जेलाही बळ देतात. हिवाळ्यामध्ये आपण नेहमीच गरम पदार्थ खायला हवेत. 

उन्हाळा: उन्हाळ्यामध्ये आपल्या आहारामध्ये गोड, आंबड, हलक्याफुलक्या, थंडावा देणा-या आणि खनिजांनी समृद्ध अशा पदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. भरपूर हर्ब्ज खा आणि फळांचा रस भरपूर प्रमाणात घ्या. मसालेदार किंवा गरम पदार्थ खाणे टाळा. भरपूर पाणी पिऊन शरीरातील आर्द्रता टिकवून ठेवा आणि अँटिऑक्सिडन्ट्स मिळवा. भरपूर ताजी फळे, अ‍ॅस्परागस, काकडी, सेलरी आणि हिरव्या पालेभाज्यांसारख्या भाज्या हा उन्हाळ्यातील आदर्श आहार आहे. या काळात प्रथिने, झिंक, अ, क आणि ई जीवनसत्व यांची रेलचेल असलेले पदार्थ खायला हवेत.

आपल्या आहारात सिट्रस वर्गातील फळांचा समावेश आवर्जून करा, कारण या फळांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी महत्त्वाचे असलेले क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. या काळात आपल्या आहारात आवळा, पुदीना, वेलची, तुळस यांसारख्या वनौषधींचाही समावेश करण्याचा प्रयत्न करा. हे पदार्थ तुमची रोगप्रतिकारशक्ती अधिक बळकट बनवतील व ऋतुबदलामुळे होणा-या संसर्गांचा प्रतिकार करण्यासाठी तुमच्या शरीराला सुसज्ज बनवतील. 

ऋतूंनुसार या आहारविषयक सल्ल्यांचे पालन केल्यास तुम्ही निश्चितच निरोगी, तंदुरुस्त आणि खंबीर राहू शकाल.

CoronaVirus : समोर आली कोरोनाची नवीन ३ लक्षणं; दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो संसर्गाचा धोका

खुशखबर! पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला कोरोनाची लस मिळणार; चीनी कंपनी 'सिनोवॅकचा' दावा

खुशखबर! जॉनसन अ‍ॅण्ड जॉनसनची लस शेवटच्या टप्प्यात; ६० हजार लोकांवर चाचणी होणार

Web Title: How to eat according to the seasons for good health?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.