लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 09:05 IST2026-04-26T09:04:51+5:302026-04-26T09:05:32+5:30
दर महिन्याला अशा किमान गंभीर केसेस येतात ज्यामध्ये शस्त्रक्रिया करावी लागते. लहान खडे औषधांद्वारे बाहेर काढले जातात, परंतु मोठ्या खड्यांसाठी शस्त्रक्रिया करावी लागते.

लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका
नवी दिल्ली - सहसा मोठ्या माणसांमध्ये आढळणारी किडनी स्टोनची समस्या आता लहान मुलांमध्येही वेगाने वाढताना दिसत असून, ही बाब वैद्यकीय तज्ज्ञांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. अनेक सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दर आठवड्याला किडनी स्टोनचे नवीन रुग्ण दाखल होत आहेत.
विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे अशा केसेसमध्ये मोठी वाढ झाली आहे. वेळीच तपासणी, योग्य मूल्यमापन आणि जीवनशैलीत बदल करून ही समस्या टाळणे शक्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तज्ज्ञांच्या मते, ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये किडनी स्टोनचे प्रमाण सर्वाधिक आढळत आहे. यामध्ये किडनीसह पित्ताशय आणि लघवीच्या पिशवीतील खड्यांचाही समावेश आहे. दर महिन्याला अशा किमान गंभीर केसेस येतात ज्यामध्ये शस्त्रक्रिया करावी लागते. लहान खडे औषधांद्वारे बाहेर काढले जातात, परंतु मोठ्या खड्यांसाठी शस्त्रक्रिया करावी लागते.
मुख्य कारणे व खबरदारी
मुलांमध्ये किडनी स्टोन होण्यामागे चुकीचा आहार, डिहायड्रेशन, आनुवंशिकता आणि बदलती जीवनशैली ही मुख्य कारणे आहेत. उन्हाळ्यात पुरेसे पाणी न प्यायल्याने शरीरातील खनिजांचे संतुलन बिघडते आणि खडे तयार होण्याची शक्यता वाढते. याव्यतिरिक्त आहारात मिठाचे जास्त प्रमाण आणि जंक फूडचे अतिसेवन यामुळे हा धोका अधिक बळावतो. ज्या कुटुंबांमध्ये आधीच किडनी स्टोनचा इतिहास आहे, त्यांनी मुलांच्या बाबतीत अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.
पालकांसाठी सल्ला
किडनी स्टोनची लक्षणे बऱ्याचदा सामान्य आजारासारखी वाटतात, त्यामुळे पालक त्याकडे दुर्लक्ष करतात. पोटदुखी आणि चिडचिडेपणा, लघवी करताना त्रास होणे, थंडी वाजून जोरात ताप येणे किंवा सतत उलट्या होणे ही स्टोनची प्रमुख लक्षणे असू शकतात. बालरोग तज्ज्ञांनी आवाहन केले आहे की, कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. सोनोग्राफी आणि युरिन टेस्टद्वारे या आजाराचे निदान होऊ शकते. मुलांच्या आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवा, त्यांना जंक फूडपासून दूर ठेवा आणि भरपूर पाणी पिण्याची सवय लावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.